विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात : ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष : अंतर्गत राजकारणाचा फटका
वार्ताहर /किणये
बहाद्दरवाडी गावातील प्राथमिक मराठी शाळेजवळील गटारीत सांडपाणी तुंबले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. शाळेच्या व एसडीएमसी कमिटीच्यावतीने किणये ग्रा. पं. ला निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष झाल्याची माहिती एसडीएमसी कमिटी अध्यक्ष भरमाणी नानू पाटील यांनी दिली.
सीमाभागातील मराठी शाळांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. शाळांच्या मोडकळीस आलेल्या इमारती, शौचालय, क्रीडांगण व इतर समस्यांमुळे सीमाभागातील विद्यार्थी वर्ग त्रस्त आहे. त्यांच्या उज्ज्वल भवितव्याकडे सरकारचे दुर्लक्ष का होत आहे? असा सवाल सीमाबांधवांतून व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील मराठी प्राथमिक शाळांसमोरील गटारीच्या सांडपाण्याची समस्या दोन-तीन वर्षांपासून निर्माण झाली आहे. याकडे किणये ग्रा. पं. जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे, असे काही पालकांचे म्हणणे आहे.
शाळेजवळील गटारीची स्वच्छता करून गावच्या वेशीजवळील मोरीची दुरुस्ती करावी, या मागणीचे निवेदन प्राथमिक मराठी शाळा बहाद्दरवाडी यांनी गेल्या 4 ऑक्टोबर रोजी ग्रा. पं. ला दिले होते. यावर मुख्याध्यापिका एस. एस. पाटील यांची स्वाक्षरी आहे.
सदर निवेदन एसडीएमसी अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी दिले आहे. त्या वर पीडीओ रमेश कुडची यांनी सही केल्याची माहिती पाटील यांनी दिली. बहाद्दरवाडी ग्रा.पं. उपाध्यक्ष मल्लाप्पा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बहाद्दरवाडी गावच्या वेशीतील मोरीचे काम चुकीचे झाले आहे. शाळेजवळील गटारीची समस्या दूर करण्यासाठी किणये ग्रा.पं.ने दोन लाखाचा निधी मंजूर केला आहे. चार-पाच दिवसात या कामाला सुरुवात करणार आहोत. पण काही जण जाणीवपूर्वक राजकारणातील राग मनात ठेवून गावचे व पंचायतीचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सांगितले.









