मागील 4 वर्षांपासून परिवहनचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील प्रदूषण कमी होण्याबरोबरच इंधनाची बचत व्हावी, याकरिता परिवहनने सुरू केलेल्या ‘बस डे’ उपक्रमाकडे दुर्लक्ष झाल्याने मागील काही वर्षांपासून हा उपक्रम बंद पडला आहे. परिवहनमार्फत दर महिन्याच्या 10 तारखेला बस डेचे आयोजन केले जात होते. दरम्यान सर्व प्रवाशांनी इतर कोणत्याही वाहनांनी प्रवास न करता केवळ परिवहनच्या बसनेच प्रवास करावा, असा या उपक्रमाचा उद्देश होता. यामुळे शहरातील वाहतूककोंडीदेखील कमी होऊन परिवहनच्या महसुलातही वाढ होणार होती. मात्र काही महिन्यांतच हा उपक्रम बंद पडला. त्यामुळे पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे.
बस डेच्या उपक्रमाला सुरुवातीच्या काळात शासकीय अधिकाऱयांना बोलावून उद्घाटन करण्यात येत होते. दरम्यान प्रवाशांचाही उत्तम प्रतिसाद मिळत होता. मात्र मागील चार वर्षांपासून हा उपक्रम झालेलाच नाही. त्यामुळे नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे सुरुवातीच्या काही दिवसांतच हा उपक्रम बंद पडला आहे. दरम्यान कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे काही दिवसांतच बस डेची संकल्पना कुचकामी ठरली आहे. बस डेच्या उपक्रमामुळे बसना प्रवाशांची संख्या वाढणार होती. त्यामुळे साहजिकच महसुलात वाढ होणार होती. मात्र काही दिवसांतच हा उपक्रम बंद झाल्याने महसुलावरही पाणी फिरले आहे.
जनजागृतीचा अभाव
परिवहनने बस डेबाबत सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत जनजागृती करायला पाहिजे होती. ती झाली नाही. तसेच बस डेबाबत नागरिकदेखील उदासिन असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा उपक्रम रखडला आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक वाढविण्यासह वाहतूककोंडी मुक्तता करणे हा ही या उपक्रमाचा उद्देश होता. मात्र हा उपक्रम काही दिवसांतच बंद झाल्याने कोणताच उद्देश यशस्वी झाला नाही.
महिला बसकडेही कानाडोळा
शहरात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महिलांसाठी स्वतंत्र बस धावणार होती. मात्र याकडेही दुर्लक्ष झाल्याने महिलांना सार्वजनिक बसमधूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे महिलावर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.









