सरपंच रणजीत उसगांवकर यांची कारवाई
प्रतिनिधी / म्हापसा
बस्तोडा पंचायत क्षेत्रात असलेल्या म्हापसा तार नदी नजीक बस्तोडा, उसकई, पालये, मयडा, थिवी, गिरी येथील नागरिक गावठी भाजी तसेच त्यात भर म्हणून बिगर गोमंतकीय मासेवाले, बेळगावची भाजीही घेऊन येणारे ट्रक या ठिकाणीच माल रिकामा करीत होते. यामुळे सोशल मिडिया, फेसबुक आदींवर फोटो घालून बस्तोडा पंचायत मंडळाचे नाव बदनाम करण्यात येत होते. हा प्रकार होत असल्याने नागरिकांच्या तक्रारीवरून बस्तोडचे सरपंच रणजीत उसगांवकर यांनी कारवाई करीत पोलिसांच्या मदतीने येथे बसणाऱया भाजी विक्रेत्यांची भाजी, मासे, आदी सामान ताब्यात घेऊन पंचायतीच्यावतीने रितसर सिलबंद केले. या प्रकरणामुळे विक्रेत्यांनी नाराजीचा सूर काढला असून गावातील नागरिकांनी मात्र या कारवाईचे स्वागत केले आहे.
राज्यात प्रथम जनता करफ्यू व नंतर पूर्णतः लॉकडाऊन केल्याने सर्व व्यवहार बंद झाला. प्रथम दोन तीन दिवस सकाळच्या वेळेत बार्देश तालुक्यातील स्थानिक आपली भाजी, केळी, फळे आदी म्हापसा बाजारपेठेत आणून विक्री करू लागले मात्र म्हापसा नगरपालिका आणि पोलिसांनी त्यांना हाकलल्यावर या सर्वांनी आपले बस्तान म्हापसा तार नदीजवळ बस्तोडा पंचायत क्षेत्रातील चार रस्त्यावर मांडले. हळूहळू या ठिकाणी भाजी आणि मासे तसेच आदी सामान सकाळच्या वेळेत मिळत असल्याचे समजल्यावर दर दिवशी येथे बाजाराचे स्वरूप सकाळच्यावेळी येऊ लागल्याने येथील फोटो वॉट्सऍप व सोशल मिडीयावर वायरल होऊ लागले. यात बस्तोडा पंचायतीच्या आशीर्वादाने हे सर्व काही सुरू असल्याचा सूर येऊ लागला. स्थानिक पंचायतीचे सरपंच रणजीत उसगावकर यांनी या स्थानिक तलसेच बिगर गोमंतकीयांना चार पाच वेळा उठविण्याचा प्रयत्न केला मात्र ते जो पर्यंतच. ते गेल्यावर येरे माझ्या मागल्या असा प्रकार हू लागला. अखेर गुरुवारी सरपंचांनी आक्रमक भूमिका घेत या भाजीवाल्यांच्या टोपल्या जप्त केल्या व सिलबंद करून रितसर पंचायतीत ठेवल्या.
ही कारवाई सुरूच राहाणार – सरपंच रणजीत उसगांवकर
दरम्यान याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी सरपंच रणजीत उसगांवकर यांच्याकडे संपर्क साधला असता ते म्हणाले, या ठिकाणी दररोज मोठय़ा प्रमाणात गर्दी होत होती. तोंडाला कुणीही मास्क घालत नव्हते शिवाय डिस्टन्सही ठेवत नसल्याने आपल्याला गावातील अनेक लोकांचे तसेच पोलीस वर्गाचेही फोन येऊ लागले. कोरोना या महाभयंकर रोगाने देशभराला ग्रासले आहे अशात येथे लागण झाल्यास मोठा अनर्थ होईल. आपण फक्त बस्तोडा वा मयडा येथीलच भाजी विक्रेत्यांना नाही तर सर्वांवर कारवाई केली आहे. कायद्याचे पालन करण्यास कुणीही तयार नव्हते. सांगितल्यास ऐकत नव्हते. उलट यामुळे आपले नाव नाहक बदनाम होत होते. त्याची दखल घेऊन ही कारवाई झाल्याची माहिती बस्तोडा सरपंच रणजीत उसगांवकर यांनी दिली.
तर स्थानिक भाजी विक्रेत्यांनी पोट कसे चालवायचे– महेश साटेलकर
दरम्यान याठिकाणी मयडा येथील भाजी विक्रेत्या महिला सकाळी गावठी भाजी नाब, मुळे, तोंडली, हळसाणा, पडवळ, घोसाळी, वाली आदी भाजी घेऊन याठिकाणी येत होत्या. मयडा येथील भाजी विक्रेत्यांची भाजी बस्तोडा पंचायतीने ताब्यात घेऊन त्यांच्या टोपल्या सिल केल्या. ही भाजी पीक काढण्यासाठी सुमारे 3 महिन्याचा अवधी लागतो. त्यासाठी स्थानिक शेतकरी खूप कष्ट करतात. यंदा कोरोना झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यात काही भाजी विकून आपले घर चालविणाऱया व उदरनिर्वाह करणाऱया विक्रेत्यांची भाजीच बस्तोडा पंचायत ताब्यात घेऊ लागली तर त्यांनी आपले पोट कसे चालवायचे, असा प्रश्न मयडेचे पंच महेश साटेलकर यांनी केला आहे. त्यांनी बस्तोडा सरपंच रणजीत यांच्याशी संपर्क साधून आपल्या गावातील भाजी विक्रेत्यांची व्यथा मांडली.