वार्ताहर /किणये
बस्तवाड (हलगा) गावची कन्या लक्ष्मी संजय पाटील हिने हरिहर (दावणगिरी) येथे झालेल्या महिलांच्या कुस्तीत 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकत बेळगावचे नाव उज्ज्वल केले. या यशाबद्दल तिचे परिसरात कौतुक होत आहे.
गांधी मैदान, हरिहर (जि. दावणगिरी) येथे मंगळवारी संपन्न झालेल्या कुस्ती मैदानात 55 किलो वजनी गटात लक्ष्मी पाटील हिने यश संपादन केले.
या स्पर्धेत विविध तालुक्यातील व जिल्हय़ातील महिला मल्ल सहभागी झाले होते. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेल्या लक्ष्मीने यापूर्वी देखील तालुका व जिल्हास्तरावर अनेक कुस्ती मैदाने गाजवली
आहेत.
दहाव्या इयत्तेत शिकणारी लक्ष्मी हल्याळ येथील डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये सराव करत असून तुकाराम घाडी तिचे प्रशिक्षक आहेत. लक्ष्मीचे वडील संजय पाटील शेतकरी असून त्यांची ज्येष्ठ कन्या शीतल हिने देखील यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदकाची कमाई केली आहे.









