सुकमामध्ये लस अन् औषधेही मागवत असल्याचा दावा
वृत्तसंस्था /सुकमा
छत्तीसगडच्या जंगली भागात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांपर्यंतही कोरोना संक्रमण पोहोचले आहे. मागील काही दिवसांत तेथे 10 हून अधिक नक्षलवाद्यांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. यातील 8 जणांच्या मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यात आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे.
दक्षिण बस्तरमधील नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी संक्रमणाशी लढण्यासाठी लस आणि औषधेही मागविली आहेत. आजारी असलेल्या नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करावी, पोलीस त्यांच्यावर उपचार करवतील असे आवाहन दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिषेक पल्लव यांनी केले आहे.
कोरोना आणि फूड पॉयजनिंग आता नक्षलवाद्यांसमोर सर्वात मोठी समस्या ठरत आहे. काही मोठय़ा कॅडरचे नक्षलवादीही कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. काही दिवसांपूर्वी कोंटा आणि दोरनपाल भागात नक्षलवाद्यांनी कोरोना लस आणि औषधे लुटली होती अशी माहिती दंतेवाडा पोलिसांना मिळाली आहे.
बस्तर विभागात 100 हून अधिक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या बाधितांमध्ये 25 लाख रुपयांचे इनाम जाहीर असलेली सुजाता, जयलाल आणि दिनेश देखील सामील आहे. या भागात सरकारनेही आंध्रप्रदेश स्ट्रेनवरून इशारा दिला आहे. नक्षलवादी याच स्ट्रेनने संक्रमित असल्याची भीती अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.









