प्रवाशांची संख्या घटतीच : काही बसेस जागेवरच : परिवहनला फटका
बेळगाव / प्रतिनिधी
लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने गेल्या मंगळवारपासून राज्यांतर्गत मार्गावर बस वाहतूक सुरू आहे. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने बसेस रस्त्यांवर … प्रवासी घरात अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे परिवहनला मोठा फटका बसत आहे. बसस्थानकातून सोमवारी सकाळी लांब पल्ल्यासह शहर व ग्रामीण भागात मिळून केवळ 65 बसेस विविध रस्त्यांवरून धावल्या. बसमधून मात्र हातावर मोजण्याइतपत प्रवासी होते. प्रवाशांची संख्या फारच कमी असल्याने काही बसेस तर जागच्या जागीच थांबून होत्या.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने तब्बल दोन महिन्यांनी काही ठिकाणी बसेस धावत असल्या तरी प्रवाशांनी पाठ फिरविल्याने बसस्थानकात केवळ बसचालक व वाहकांची वर्दळ दिसून येत आहे. सोमवारी सकाळी बेळगाव-हुबळी, बेळगाव-धारवाड, बेळगाव-बेंगळूर, बेळगाव-कुंदापूर, बेळगाव-चिकोडी, बेळगाव-संकेश्वर, बेळगाव-विजापूर, बेळगाव-बागलकोट, बेळगाव-खानापूर, बेळगाव-गोकाक, बेळगाव-बैलहोंगल आदी ठिकाणी 23 हून अधिक गाडय़ा धावल्या असल्या तरी प्रवाशांची संख्या फारच अल्प प्रमाणात होती. बसेस सुरू झालेल्या पहिल्या तीन दिवसांत बेंगळूरकडे दररोज 10 ते 12 बसेस धावत होत्या. मात्र आता रेल्वे सुरू झाल्याने बेंगळूरला केवळ दोन-तीनच गाडय़ा जात आहेत.
शहरातील अनगोळ, वडगाव, शाहूनगर यासह ग्रामीण भागातील के. के. कोप्प, कट्टणभावी, कुदेमनी, काकती, तीर्थकुंडये, बसरीकट्टी, सुळेभावी, मुचंडी, हलगा-बस्तवाड, मास्तमर्डी, चंदनहोसूर, जानेवाडी, संतिबस्तवाड, खादरवाडी, कर्ले आदी गावांना जाण्यासाठी बसस्थानकात बसेस प्रवाशांच्या प्रतीक्षेत होत्या. प्रवाशांसाठी बसस्थानकात बसेस सज्ज ठेवण्यात येत असल्या तरी प्रवासी मिळत नसल्यामुळे बसचालक व वाहकांना ताटकळत थांबावे लागत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करूनच त्यांना बस स्थानकात प्रवेश दिला जात आहे. प्रवाशांसह बसचे चालक आणि वाहकांनाही मास्क वापरणे बंधनकारक आहे. निर्जंतुकीकरण करूनच प्रवासासाठी बसेस वापरण्यात येत आहेत. प्रवास सुरक्षित व कोणालाही धोका होऊ नये, यासाठी प्रवासी क्षमता 30 करण्यात आली असली तरी 10 ते 15 प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत. बससेवा सुरू होऊन सात दिवस उलटले तरी प्रवाशांची संख्या समाधानकारक नसल्यामुळे परिवहनला फटका बसत आहे.
बसस्थानकात केवळ बेंगळूरसाठी आगाऊ बुकिंग सुरू आहे. दररोज बसस्थानकातून 5 साध्या बसेस तर 3 बसेस वातानुकूलित धावत आहेत. कोरोनाच्या धास्तीने बुकिंग करण्याकडे प्रवाशांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे बुकिंगला फटका बसला आहे.









