बेळगाव / प्रतिनिधी
शहरात सुरू असलेली स्मार्ट सिटीचे कामे… अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते… अर्धवट स्थितीत असलेले रस्ते… अनेक रस्त्यावर एकेरी वाहतूक… वाढती वाहनांची संख्या यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकदा का शहरात प्रवेश केला की वाहतूक कोंडीतून बाहेर पडताना वाहनधारकांची कसरत सुरू होते. असे चित्र सध्या शहरातील अनेक रस्त्यांवर दिसून येत आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून सर्किट हाऊसपासून ते जुन्या भाजी मार्केटकडे जाणाऱया रस्त्यावर बसस्थानकाच्यासमोर वाहतुकीची कोंडी नित्याची बाब ठरत आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणाऱया वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बसस्थानकाच्या शेजारील इतर रस्त्यांवर स्मार्ट सिटीची कामे सुरू असल्याने सर्किट हाऊसपासून जुन्या भाजी मार्केटकडे जाणाऱया रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. शहरात येणाऱया इतर रस्ते बंद असल्याने या रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यातच जिल्हय़ांतर्गत व आंतरराज्य बससेवा सुरू झाल्याने बसफेऱया वाढल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावर लांबच लांब रांगा लागत आहेत.
शहरात येणाऱया वाहनांची व बसस्थानकात येणाऱया बसेसची संख्या अधिक असल्याने बसस्थानकाच्या प्रवेशव्दारजवळ वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्याबरोबर प्रवेशव्दाराजवळ प्रवाशांसाठी थांबत असलेल्या रिक्षा व प्रवाशांची वर्दळ वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे इतर मार्ग वाहतुकीसाठी खुले करावेत. अशी मागणी होत आहे.









