प्रतिनिधी / बेळगाव
सतत गजबजणाऱया मध्यवर्ती बसस्थानकात पार्किंगची व्यवस्था नसल्याने प्रवाशांसह वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकाच्या आवारात तब्बल 31 कोटींच्या निधीतून सुसज्ज स्मार्ट बसस्थानक उभारण्यात येत आहे. त्यामुळे बसस्थानकात तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, या बसस्थानकात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे.
अनलॉकनंतर बससेवा पूर्वपदावर येत आहे. प्रवाशांचा प्रतिसादही वाढत आहे. प्रशासनाने पदवी, पदव्युत्तर महाविद्यालयांबरोबर आता दहावी-बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे पासधारक विद्यार्थ्यांबरोबर प्रवाशांची संख्यादेखील वाढली आहे. मात्र, बसस्थानकात वाहने घेऊन येणाऱया प्रवाशांना पार्किंगअभावी आपली वाहने रस्त्यावरच पार्क करावी लागत आहेत. परिणामी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. बसस्थानकातून दररोज खानापूर, संकेश्वर, बैलहोंगल, चिकोडी, निपाणी या मार्गांवर प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. सर्रास प्रवाशी आपल्या दुचाकी बसस्थानकात पार्क करून पुढील प्रवास करत असतात. मात्र, बसस्थानकात पार्किंगची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना आपली दुचाकी बसस्थानकाच्या बाहेर रस्त्यावरच पार्क करून बसस्थानकात प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे बसस्थानकात वाहनधारकांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.