बस, रिक्षा, पादचाऱयांच्या रहदारीत वाढ
प्रतिनिधी/ बेळगाव
बसस्थानकाचा विकास साधण्यासाठी आवारात असलेले तात्पुरते बसस्थानक पी. बी. रोडच्या दिशेला हलविण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या पी.बी. रोडवर वाहतुकीची कोंडी होत आहे. प्रवाशांच्या सोयीखातर बसस्थानकाच्या आवारात तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली होती. मात्र आता स्मार्ट बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बसस्थानकाच्या आवारात इतर सुविधा पुरविण्यासाठी तात्पुरते बसस्थानक हलविण्यात आले आहे.
बसस्थानकाच्या आवारात पी. बी. रोडच्या दिशेला तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी स्थानिक आणि लांबपल्ल्याच्या बस थांबविल्या जात आहेत. शिवाय या ठिकाणी असलेल्या प्रवेशद्वारावर वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. स्थानिक बस, प्रवाशांसाठी थांबलेल्या रिक्षा, फेरीवाले, फूटपाथवर असलेले खाद्यपदार्थांचे गाडे आणि टपऱया यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान लग्नसराई, यात्रा-जत्रा यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. शिवाय काही ठिकाणी बसफेऱयाही वाढविल्या गेल्या आहेत. तसेच शाळांना सुट्टी असल्यामुळे ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
बसस्थानकाच्या आवारात नवीन तात्पुरत्या बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र अद्याप बऱयाच प्रवाशांना याची कल्पना नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबरोबरच आवारात शौचालय आणि पाण्याची सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.









