बेळगाव / प्रतिनिधी
शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा झाले असून वाहतूक क्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. दररोज हजारो प्रवाशांनी गजबजलेल्या बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ वाहतूक कोंडी नित्याची बाब ठरत आहे. येथील वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक व प्रवासी हैराण झाले आहेत.
स्मार्ट सिटीअंतर्गत बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. त्याबरोबर दोन्ही बसस्थानके जोडण्यासाठी भुयारी मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे जुने प्रवेशद्वार आणि रस्ता बंद आहे. सर्किट हाऊसपासून जुन्या भाजी मार्केटकडे जाणाऱया मार्गावर प्रवेशद्वार सुरू करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी आता वाहतुकीची कोंडी होत असल्याने प्रवाशांना बसस्थानकात प्रवेश करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते बंद आहेत. काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. परिणामी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना इच्छीतस्थळी पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावे लागत आहेत. सर्किट हाऊस ते जुन्या भाजी मार्केट रोडवर वाहनांची संख्या वाढली आहे. बसस्थानकाचे प्रवेशद्वार याच मार्गावर असल्याने सर्व बसेस या मार्गावरून धावत आहेत. सध्या स्थानिक बसेससह लांब पल्ल्याच्या बसेसची संख्या वाढली आहे. त्यातच बाजारपेठेत जाणाऱया सर्रास वाहनांची ये-जा या मार्गावरून सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा ताण वाढून लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे येथील वाहतूक क्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करा
चन्नम्मा सर्कलपासून कोल्हापूर सर्कलपर्यंतच्या रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. तसेच शहरातील कॉलेज रोड, चन्नम्मा सर्कल, बसस्थानक मार्ग, सर्किट हाऊस मार्ग, काँग्रेस रोड, क्लब रोड, जुना पी. बी. रोड, आंबेडकर मार्ग आदी ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणची वाहतूक वळविण्यात आली असून काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यांवरून वाहने चालविताना वाहनधारकांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.









