प्रतिनिधी / बेळगाव :
शहरात ठिकठिकाणी स्मार्ट सिटीअंतर्गत गटारी, डेनेज व सिमेंटच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने काही ठिकाणी रस्ते बंद तर काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी नित्याची बाब ठरत आहे.
बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ होणारी वाहतुकीची कोंडी बस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. बसस्थानक परिसरातील पादचारी व प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती बसस्थानक आणि शहर बसस्थानक (सीबीटी) भुयारी मार्गाने जोडण्याचे काम सुरू आहे. बसस्थानकात प्रवेश करणारे जुने द्वार बंद करून सध्या जुन्या पी. बी. रोडवरून बसस्थानकात प्रवेश दिला जात आहे. त्याचबरोबर शहरात प्रवेश करणारी सर्रास वाहने येथून ये-जा करत असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारी काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे शहरात येणाऱया वाहनांची संख्या वाढली होती. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात निर्माण केलेल्या बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी काहीकाळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.









