ये-जा करणाऱया प्रवाशांना नाहक त्रास : परिवहन मंडळाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
नेहमी हजारो प्रवाशांनी गजबजणाऱया मध्यवर्ती बसस्थानकात जागोजागी खड्डे पडून डबकी निर्माण झाली आहेत. तसेच सोमवारी झालेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे बसस्थानकाच्या आवारात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे बसस्थानकात ये-जा करणाऱया प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात स्मार्ट बसस्थानकाचे काम सुरू आहे. शिवाय भुयारीमार्गही करण्यात येत आहे. याकरिता आवारात माती टाकण्यात आली आहे. तर काही ठिकाणी खोदकामही करण्यात आले आहे. त्यातच पावसाला सुरुवात झाल्याने सर्वत्र चिखलच चिखल पहायला मिळत आहे. यातूनच बसचालकांना व प्रवाशांना वाट काढावी लागत आहे.
आवारात सगळीकडेच डबकी निर्माण होऊन चिखलाचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांना कसरत करतच बसचा शोध घ्यावा लागत आहे. दरम्यान एखादी बस जवळून गेल्यानंतर चिखलाचे गढूळ पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. गतवषीदेखील पावसाळय़ात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. स्थानिक बसस्थानकाच्या थांब्याजवळ डबक्याचे स्वरूप आल्याने प्रवाशांना बसमध्ये चढताना कसरत करावी लागत आहे. परिवहनने याची दखल घेऊन आवारातील खड्डे बुजवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
अनलॉकनंतर विविध मार्गांवर बस धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्यादेखील वाढली आहे. मात्र बसस्थानकाच्या आवारात चिखलाचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसथांब्यावरील पत्र्यांनादेखील गळती लागल्याने प्रवाशांना बसथांब्यात थांबणे कठीण झाले आहे.
सुविधांपेक्षा असुविधांचाच सामना
लॉकडाऊन काळात परिवहनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे बसस्थानकात येणाऱया प्रवाशांना सुविधांपेक्षा असुविधांचाच सामना करावा लागत आहे.









