बससेवा पूर्ववत करण्याची प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या विटंबनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा बससेवेवरदेखील मोठा परिणाम झाला आहे. मागील दोन दिवसांपासून बससेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थीवर्गाचे हाल होताना दिसत आहेत.
यंदा शैक्षणिक वर्ग उशिराने सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांना बसपासदेखील उशिराने उपलब्ध झाले. मात्र, बससेवा सातत्याने ठप्प होत असल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी आर्थिक भुर्दंडही बसत आहे. तालुक्मयातील कुदेमनी, उचगाव, मण्णीकेरी, केदनूर, कल्लेहोळ, आंबेवाडी, संतिबस्तवाड, रणकुंडये, कर्ले, बेळवट्टी, कावळेवाडी, बाकनूर, अतिवाड, राकसकोप, हंदिगनूर, राजगोळी, मंडोळी आदी गावांची बससेवा ठप्प झाल्याने विद्यार्थीवर्गाची मोठी गैरसोय होत आहे.
यंदा शैक्षणिक वर्षाला उशिराने सुरुवात झाली आहे. विद्यार्थी ऑफलाईन वर्गांना उपस्थित रहात आहेत. मात्र, बससेवेचे तीनतेरा वाजल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबरोबरच शिक्षकांचीदेखील बससेवेअभावी हेळसांड होत आहे. काही गावांतून खासगी वाहनांचीदेखील सोय नसल्याने ये-जा करणे अडचणीचे झाले आहे. दरम्यान, बसबरोबर खासगी वाहने नसल्याने शिक्षक शाळेत अनुपस्थित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा शैक्षणिक जीवनावर परिणाम होत आहे.
ग्रामीण भागातून शहराकडे शाळा-महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. सर्रास विद्यार्थी बसपासच्या आधारेच प्रवास करत असतात. मात्र, बसच बंद असल्याने प्रवासासाठी विद्यार्थ्यांना पैसे मोजावे लागत आहेत. तसेच प्रवाशांना खासगी वाहनांतून लोंबकळत धोकादायक प्रवास करावा लागत आहे. काही वडापचालक या संधीचा फायदा घेत अधिक भाडे आकारत आहेत. त्यामुळे बससेवा पूर्ववतपणे सुरळीत आणि नियमित करावी, अशी मागणी विद्यार्थीवर्गातून होत आहे.









