उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची माहिती : शेतकरी संघटनांकडून आज कर्नाटक बंदची हाक
प्रतिनिधी/ बेंगळूर
भू-सुधारणा दुरुस्ती विधेयक (दुसरे), एपीएमसी दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवून राज्यातील शेतकरी संघटनांनी सोमवार दि. 28 सप्टेंबर रोजी ‘कर्नाटक बंद’ ची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यभरात बस वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले. बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री सवदी पुढे म्हणाले, सोमवारी बंद असल्याने बस, सरकारी मालमत्तांना कोणताही धक्का पोहचू नये यासाठी खबरदारी घेण्यासाठी यापूर्वीच ज्येष्ठ पोलीस अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. एखाद्यावेळेस अशा घटना घडल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यास आमचे सरकार मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्य सरकारने शेतकऱयांच्या हितासाठी भू-सुधारणा दुरुस्ती विधेयक (दुसरे), एपीएमसी दुरुस्ती विधेयक अंमलात आणले आहे. तसेच शुक्रवारी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱयांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली आहे. याचबरोबर विधानसभेतही या विधेयकाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तरीही काही संघटनांनी बंदची हाक दिली आहे, हे दुर्दैवी आहे, असे सवदी म्हणाले.
राज्यातील जनता कोरोनाच्या भीतीपोटी असताना अशा प्रकारचे आंदोलन करणे योग्य नाही. सार्वजनिकांच्या हिताच्या दृष्टीने बंदचा निर्णय शेतकरी संघटनांनी मागे घ्यावा, असे आवाहन लक्ष्मण सवदी यांनी केले.
कर्नाटक बंदला निजदचा संपूर्ण पाठिंबा…
राज्यात शेतकरी संघटनांनी दिलेल्या कर्नाटक बंदच्या हाकेला निजदचा संपूर्ण पाठिंबा आहे. अन्नदाताविरोधातील भू-सुधारणा दुरुस्ती विधेयक (दुसरे) आणि एपीएमसी दुरुस्ती विधेयकाला आमचा विरोध आहे.
एच. डी. देवेगौडा
-निजद सर्वेसर्वा
बंदची हाक मागे घ्या…
भू-सुधारणा दुरुस्ती विधेयक (दुसरे) आणि एपीएमसी दुरुस्ती विधेयक ही दोन्ही शेतकऱयांच्या हितासाठी जारी करण्यात आली आहेत. याबाबत कोणताही गोंधळ नको. शेतकरी संघटनांनी सोमवारी कर्नाटक बंदची दिलेली हाक मागे घ्यावी.
बी. एस. येडियुराप्पा
-मुख्यमंत्री
शेतकऱयांच्या आंदोलनला पाठिंबा…
शेतकऱयांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदला काँग्रेस पाठिंबा देणार आहे. शेतकऱयांच्याविषयी आंदोलनाला पाठिंबा देण्यास काँग्रेस मागे हटणार नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष असल्याने केवळ राज्यात पाठिंबा देणे योग्य नसून संपूर्ण देशभरात पाठिंबा देणे आवश्यक आहे.
डी. के. शिवकुमार
-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष









