प्रतिनिधी/ बेळगाव
महात्मा बसवेश्वर हे दक्षिण भारतातील महापुरुष म्हणून ओळखले जायचे. कर्नाटक ही त्यांची कर्मभूमी असली तरी महाराष्ट्रातून त्यांच्या कार्याचा प्रारंभ झाला आहे. धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य क्रांतिकारक आहे, असे विचार नांदेड येथील डॉ. रविंद बेंबरे यांनी मांडले.
सरस्वती वाचनालय शहापूरतर्फे आयोजित बसवेश्वर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘महात्मा बसवेश्वर आणि महाराष्ट्र ः एक अनुबंध’ या विषयावर ते बोलत होते.
व्यासपीठावर आरटीओ शिवानंद मगदूम, आर. एम. करडीगुद्दी, एस. जी. आरबोळे, उपस्थित होते. प्रारंभी स्वागतगीत स्वराली बिल्लाळ हिने सादर केले. वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रविंद्र बेंबरे व आरटीओ शिवानंद मगदूम यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
डॉ. रविंद्र बेंबरे म्हणाले, पारंपरिक भारतीय समाजातील वर्णजातीमूलक उच्चनीचता व विषमता यांची प्रखर जाणीव बसवेश्वरांना झाली होती. बसवेश्वरांनी कर्नाटकात क्रांती केली असली तरी त्याचा आराखडा महाराष्ट्रात आखला होता. 21 वर्षे महाराष्ट्रात वास्तव्यास असलेले बसवेश्वर 1153 मध्ये मंगळवेढा सोडून कल्याणला जातात. जगतातील पहिली संसद जनतेसमोर ठेवण्याचे काम बसवेश्वरांनी केले आहे. बसवेश्वरांनी कल्याणमध्ये निर्माण केलेली शिवानुभवमंडप म्हणजेच अनुभव मंटप ही संस्था धर्मेतिहासातील अनन्यसाधारण संस्था होती. बसवेश्वरांचे विचार महाराष्ट्रात रुजले होते. याचा फायदा वारकरी संप्रदायाला झाला.
याबरोबरच बसवेश्वरांच्या विचारांचा प्रभाव संत नामदेवांच्यावर झाला होता. अनेक वाईट प्रथांना प्रखर विरोध करणाऱया बसवेश्वरांच्या निर्भय विचारसरणीचा प्रभाव कर्नाटकाबरोबर महाराष्ट्रावर देखील झाला आहे. परमेश्वर हा एकच आहे, त्याची भक्ती करावी, कोणतेही कर्म वा नीच नाही, या विचारांचा प्रसार करून त्यांनी सर्व जातींच्या लोकांना समपातळीवर आणले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रसिक श्रोते, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रज्ञा जोशी यांनी केले.









