वार्ताहर /सांबरा
बसवन कुडची येथील श्री कलमेश्वर, श्री बसवण्णा आणि श्री ब्रम्हलिंग देवाच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून सोमवार दि. 28 रोजी सायंकाळी सजविलेल्या आंबील गाडय़ांची गावात वाजतगाजत गुलालाची उधळण करत व हर हर महादेवच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
प्रारंभी विधिवत पूजा करून शिवाजी गल्ली येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आंबील गाडय़ांची मिरवणूक शिवाजी गल्ली, बस्ती गल्ली, बसवन गल्ली मार्गे जाऊन बसवण्णा कलमेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी आंबील व घुगऱया वाटण्यात आल्या.
त्यानंतर आंबील गाडे कळसगेरी तलावाजवळ पळविण्यात आले. रात्री गावात शाहिरी पोवाडय़ांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
आज मुख्य यात्रा
मंगळवार दि. 29 रोजी सकाळी मंदिरात विधिवत पूजा होईल. सायंकाळी 5 वाजता इंगळय़ांचा कार्यक्रम होणार आहे. दरवषी इंगळय़ांच्या कार्यक्रमाला परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती असते. रात्री ‘संग्या-बाळय़ा’ नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी 4 वाजता कुस्त्यांचे आयोजन केले आहे. रात्री 7 वाजता शरीरसौ÷व स्पर्धा होणार आहेत. जत्रा गुढीपाडव्यापर्यंत चालणार आहे.