यात्रेच्या पार्श्वभूमीवर पथदीप सुरू झाल्याने समाधान
प्रतिनिधी /बेळगाव
बसवण कुडची गावचा महापालिकेत समावेश करून नागरी सुविधा उपलब्ध करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची टीका नागरिक करीत आहेत. यामुळे ही बाब गांभीर्याने घेण्यात आली असून बसवण कुडची परिसरात बसविण्यात आलेले पथदीप सुरू करण्यास मुहूर्त मिळाला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर येथील पथदीप शनिवारी सुरू करण्यात आले. याप्रसंगी गावातील पंचमंडळी आणि आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
महापालिकेत समाविष्ट करून चाळीस वर्षे झाली. पण येथील समस्यांचे निवारण करण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गावातील गटारी स्वच्छ केल्या जात नसल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. तसेच केएचबी कॉलनीमधील रस्ते खराब झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच येथील समस्यांबाबत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. त्याचप्रमाणे आमदार अनिल बेनके यांना निवेदन देण्यात आले होते.त्यामुळे महापालिकेच्या शिष्टमंडळाने केएचबी कॉलनी आणि बसवण कुडची परिसरातील समस्यांची माहिती घेऊन महापालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्यात आला आहे. पण सध्या हाती घेण्यात आलेल्या कामांची पूर्ततः करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. गावात पथदीप बसविण्यात आले होते. पण सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे यात्रेच्या पार्श्वभूमीवर पथदीप सुरू करण्यात आले. याप्रसंगी पूजन करून सर्व पथदीप सुरू करण्यात आले असून गावातील अंधार दूर झाला आहे.









