गुलबर्ग्यात ईशान्य परिवहन निगमकडून दोन बसेसमध्ये अद्ययावत सुविधा
प्रतिनिधी / बेंगळूर
लहान खेडी आणि तांडांमधील लोकांना देखील कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या उद्देशाने गुलबर्गा जिल्हा प्रशासनाने ईशान्य परिवहन निगमला दोन बसेसची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. याला सकारात्मक प्रतिसाद देताना या निगमने दोन बसेसचे रुपांतर मिनी हॉस्पिटलमध्ये केले असून यामध्ये लसीकरणाची अद्ययावत व्यवस्था केली आहे. सेडमचे आमदार राजकुमार पाटील तेलकूर यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फित कापून या बसेसचे लोकार्पण
केले.
सदर बसेसमध्ये लसीकरणाची नोंदणी आणि लस घेण्यासाठी खोल्यांप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे. लस घेतल्यानंतर काही विश्रांती घेण्यासाठी बसचालकाच्या मागील भागात सहा आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पिण्याचे पाणी, ग्लुकोज व इतर औषधांची व्यवस्थाही यामध्ये करण्यात आली आहे. जुन्या बसेसनाच लसीकरण वाहनामध्ये रुपांतर करण्यात आले आहे. बसेसच्या खिडक्यांना पडद्यांचे आवरण बसविण्यात आले आहे.
एका बसमध्ये तीन कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. पहिल्या विभागात लस घेण्यासाठी येणाऱयांची नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुसऱया कक्षात लस देण्याची आणि तिसऱया कक्षात विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे.
दारोदारी जाऊन करणार लसीकरण
बसेसच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना आमदार राजकुमार पाटील तेलकूर म्हणाले, ग्रामीण भागात लोक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. विशेषतः ग्रामीण भाग आणि तांडांमध्ये राहणाऱया जनतेसाठी या विशेष बसचे लसीकरण केंद्रांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. अशा प्रकारे बसेसमध्ये प्रथमच लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेस दारोदारी जाऊन लोकांचे लसीकरण करणार आहे. याचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य खात्याच्या विनंतीनुसार सध्या दोन बसेस लसीकरणासाठी सज्ज करण्यात आल्या आहेत. आवश्यकता भासली तर अशा आणखी बसेस पुरविण्यात येतील. या योजनेमुळे ग्रामीण भागात लसीकरणाविषयी जागृतीही होईल, असे ते म्हणाले.









