प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या 9 महिन्यापासून बंद असलेल्या शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने बसपासच्या कामाला देखील चालना मिळाली आहे. कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे बसपासच्या कामालाही स्थगिती मिळाली होती. मात्र आता पदवी, पदव्युत्तर महाविद्यालयापाठोपाठ दहावी व बारावीचे वर्ग देखील सुरू झाल्याने बसपासच्या मागणीत वाढ झाली आहे. बसपास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू झाली आहे. मात्र यंदा बसपासची प्रक्रिया बदल्याने विद्यार्थ्यांच्या हाती बसपास मिळायला उशीर होणार आहे.
दरवषी शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली की परिवहन मंडळाकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. मात्र यंदा बऱयाच काळासाठी शाळा बंद राहिल्याने बसपासची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता शाळा महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना बसपास अनिवार्य आहे. मात्र यंदा परिवहनने बसपासची प्रक्रिया बदलली असून ऑनलाईनद्वारे बसपास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे.
पदवी, पदव्युत्तर महाविद्यालये 17 नोव्हेंबरपासून सुरू झाली. दरम्यान परिवहनने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या बसपासची मुदत 10 डिसेंबरपर्यंत वाढवून दिली होती. शासनाने दहावी बारावीचे वर्ग सुरू करण्याबरोबर सहावी, सातवी इत्ततेच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यागम कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे बस पास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू झाली असून ऑनलाईन केंद्रावर अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.
बसस्थानकाच्या बसपास विभागात गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू झालेल्या बसपास प्रक्रिया गतिमान झाली आहे. कर्मचाऱयांची देखील बसपास कामासाठी धडपड सुरू असलेली पहायला मिळत आहे. परिवहनने यंदा बसपासची प्रक्रिया बदलून ऑनलाईनची व्यवस्था केल्याने विद्यार्थ्यांची धावपळ उडत आहे. शिवाय बसपाचे काम देखील संथगतीने सुरू आहे.
शाळा बंद राहिल्याने बसपासचे काम देखील थांबले होते. तब्बल 9 महिन्याच्या कालावधीनंतर शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने बसपासच्या प्रक्रियेला गती आली आहे.









