प्रतिनिधी / बेळगाव
ज्येष्ट नागरिक व दिव्यांगांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी परिवहन मंडळाकडून सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. उपलब्ध करून दिलेल्या त्या बसपासचे दरवषी नूतनीकरण केले जाते. मात्र यंदा बसपासची संपूर्ण प्रक्रिया बदलल्याने दिव्यांगांना बसपास मिळविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
परिवहनकडून ज्येष्ट नागरिकांसाठी तिकीट दरात 25 टक्के सूट देण्यात येते. तर दिव्यांगांना केवळ 660 रुपयांत वर्षभरासाठी बसपास उपलब्ध केला जातो. या पासच्या आधारे दिव्यांग व्यक्ती दररोज शंभर किलो मीटरपर्यंतचा प्रवास करू शकतात. मात्र यंदा बसपासची प्रक्रिया ऑनलाईन केल्याने बसपास नूतनीकरणात अडचणी येत आहेत. शिवाय ऑनलाईन सेंटरवर तांत्रिक अडचणी येत असल्याने अर्ज दाखल करण्याच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बसपास नूतनीकरणाच्या कामाला विलंब होत आहे. त्यामुळे संबंधितांना बसपास मिळण्यास उशीर होत आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या बसपासचे काम सुरळीत करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.









