गतवषीच्या तुलनेत महसुलात वाढ, परिवहनला दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
दरवषी शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की, बसपास प्रक्रियेला सुरुवात होते. मात्र गतवर्षांपासून कोरोनामुळे बसपास प्रक्रियेला उशिराने प्रारंभ होत आहे. आतापर्यंत 33 हजार 883 विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण झाले. यामधून तब्बल 2 कोटी 59 लाख 160 रुपयांचा महसूल जमा झाला. गतवषीच्या तुलनेत बसपासधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महसूलही काही प्रमाणात वाढला आहे.
गतवर्षापासून बसपास प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. विद्यार्थ्यांना सेवासिंधू पोर्टल ऍपवर ऑनलाईन अर्ज करावा लागत आहे. त्यानंतर बसपास उपलब्ध होत आहेत. ही प्रक्रिया थोडी वेळकाढू व किचकट असल्याने विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. कोरोनाआधी 58 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण होत होते. मात्र ही संख्या आता कमी झाली आहे.
गतवषी 24 हजार 761 विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण झाले होते. त्यातून 2 कोटी 86 लाख 1410 रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. गतवषीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढली, त्यामुळे महसूलही वाढला आहे.
मागील दोन तीन महिन्यांपासून बसपास वितरणाचे काम सुरु आहे. प्राथमिक, माध्यमिक, पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना बसपासचे वितरण करण्यात आले आहे. सध्या बीएड् विद्यार्थ्यांच्या बसपास वितरणाचे काम सुरु आहे. 1550 रुपये शुल्क आकारणी करून विद्यार्थ्यांना बसपास वितरित केले जात आहेत.
यंदा बसपास घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढली
गतवषीपेक्षा यंदा बसपास घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे महसूलही वाढला आहे. सध्या बीएड्च्या विद्यार्थ्यांना बसपास वितरित केले जात आहेत. त्यानंतर एकूण विद्यार्थ्यांची संख्या आणि महसूलही समजणार आहे. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाल्याने बसपास प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.
-ए. वाय. शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर बसपास विभाग)









