परिवहनचे दुर्लक्ष, प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
अंध, दिव्यांग आणि ज्येष्ट व्यक्तींचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी परिवहन मंडळाच्यावतीने सवलतीच्या दरात वर्षभरासाठी बसपास उपलब्ध करून दिला जातो. पुढे दरवषी हाच बसपास नुतनीकरण करून वापरता येतो. मात्र गतवर्षापासून बसपासची प्रक्रिया पूर्णपणे बदल्याने अंध, दिव्यांग व ज्येष्ट व्यक्तींना बसपास मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
आरटीओ सर्कल येथील विभागीय संचार कार्यालयात अंध, दिव्यांग आणि ज्येष्ट नागरिकांना बसपास उपलब्ध करून दिला जातो. मात्र मागील महिन्याभरापासून काहींना अर्ज करूनही अद्याप बसपास उपलब्ध झाले नाहीत. संबंधितांना बसपाससाठी दररोज कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. बसपास वेळेत मिळत नसल्याने दिव्यांग, अंध व ज्येष्ट नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. संबंधितांनी सेवासिंधू पोर्टलवर अर्ज करून अर्ज केलेली पावती, बॉण्ड आणि इतर कागदपत्रे कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची छाननी करून बसपास देणे आवश्यक आहे. मात्र संबंधितांना बसपास वेळेत मिळत नसल्याने ताटकळत थांबावे लागत आहे.
अंध, दिव्यांग आणि ज्येष्ट नागरिकांनी नवीन बसपाससह नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केला आहे. मात्र परिवहनने वेळेत बसपास देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी संबंधितांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
40 टक्क्मयांहून अधिक दिव्यांग व्यक्तींना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. बसपास मिळविण्यासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, दोन छायाचित्रे, आधारकार्ड, ऑनलाईनद्वारे मिळविलेली अर्जाची प्रत आदी कागदपत्रांसह 660 रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे.









