कर्नाटक माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
बसपास ऑनलाईनच्या माध्यमातून देण्याचा फतवा काढण्यात आला. सेवा सिंधू ऍपच्या माध्यमातून बसपाससाठी अर्ज करा, असे सांगण्यात आले. मात्र, त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेव्हा पूर्वीसारखीच बसपासची व्यवस्था करावी, या मागणीसाठी कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
बसपास वितरणामध्ये बराच घोटाळा झाला आहे. हे खरे असले तरी त्यामुळे विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नका, असे निवेदनात म्हटले आहे. बसपास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन सेंटरवर जावे लागत आहे. याचबरोबर पालकांनाही त्यांच्यासोबत जावे लागते. शिक्षकांना ही माहिती देण्यासाठी एक दिवस वेळ काढावा लागतो. एकूणच त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कोरोनामुळे एक तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. असे असताना मुलांना वेठीस धरणे योग्य नाही. तेव्हा ऑनलाईन पद्धत रद्द करावी तसेच या काळात बसपासचे शुल्कच रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, शहराध्यक्ष संजीव कोष्टी, उपाध्यक्ष एन. ओ. डोणकरी, सुचिता पाटील, विद्या करेगार, सुरेश कळ्ळेकर, वामन कुलकर्णी, रेखा अष्टेकर, सुभाष मराठे, विश्वास गावडे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.









