बळ्ळारी/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बऱ्याच वेळेला रुग्णांना बेड उपलब्ध होतं नाहीत. यासाठी राज्यात अनेक ठिकाणी तात्पुरती कोविड केअर सेंटर सुरु केली आहेत. दरम्यान बळ्ळारी जवळ तोरणागळ्ळू येथे जेएसडब्ल्यू स्टीलने कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी नव्याने तयार केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयाचे बुधवारी उद्घाटन होण्याची शक्यता आहे. उद्यापासून या कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार की जाणार आहेत.
या रुग्णालयात ऑक्सिजनपुरवठा करण्यासाठी कंपनीने आपल्या स्टील प्लांटपासून पाच किमी लांबीची पाइपलाइन टाकली आहे, असे जेएसडब्ल्यू स्टीलच्या सूत्रांनी सांगितले. सुरवातीस, हे रुग्णालय २०० बेडने सुसज्ज असणार आहे आणि हळूहळू त्याची क्षमता १ हजार बेडपर्यंत वाढविली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बळ्ळारी जिल्हा प्रशासन अद्याप रुग्णालय चालविण्यासाठी आवश्यक वैद्यकीय कर्मचार्यांची भरती करू शकलेला नसला तरी कोविड केअर रुग्णालय सेवेसाठी सज्ज आहे. कंपनीने तोरणागळ्ळू येथील स्टील प्लांटला लागून असलेल्या सरकारी स्कूल कॅम्पसमध्ये आवश्यक वैद्यकीय उपकरणांसह रुग्णालयाचे काम पूर्ण केले आहे. हे रुग्णालय चालविण्यासाठी डॉक्टरांच्या ५० जागांसाठी बळ्ळारी जिल्हा प्रशासनाने अर्ज मागविले आहेत.
जेएसडब्ल्यू स्टीलच्या सूत्रांनी सांगितले की, “आम्ही तात्पुरत्या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आवश्यक वैद्यकीय कर्मचारी भरती करणे आणि रुग्णालय चालविणे जिल्हा प्रशासनावर अवलंबून आहे,” असे त्यांनी सांगितले.
या रुग्णालयाला जेएसडब्ल्यू स्टीलने बेड, वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजनची सुविधा दिली आहे. बळ्ळारी व इतर शेजारच्या जिल्ह्यांतील रूग्णांना रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत. स्टील निर्मात्याने आपल्या स्टील प्लांटमध्ये दररोज ८६० टन ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.









