ब्रिटनपेक्षा अधिक जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू : जगभरात महामारीमुळे 1 कोटी 77 लाख 93 हजार 829 बाधित
जगभरात कोरोना संसर्ग आतापर्यंत 1,77,93,829 जणांना झाला आहे. यातील 1 कोटी 11 लाख 85 हजार 980 बाधितांना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. तर 6 लाख 83 हजार 797 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. मेक्सिकोत दिवसभरात 688 कोरोनाबाधित दगावल्याने बळींचा एकूण आकडा 46 हजार 688 झाला आहे. बळींप्रकरणी मेक्सिकोने आता ब्रिटनला मागे टाकले आहे. जपानच्या ओकीनावा बेटावर आणीबाणी लागू करण्यात आली आहे. लोकांना 7 दिवसांपर्यंत घरातून बाहेर न पडण्याची सूचना करण्यात आली आहे. बेटावर 71 नवे रुग्ण सापडल्याने बाधितांचा एकूण आकडा 395 झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये 248 जण अमेरिकेचे नौसैनिक आहेत.
कॅलिफोर्निया : उच्चांकी बळी
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये दिवसभरात 288 जण दगावले आहेत. एका दिवसातील बळींचा हा आकडा उच्चांकी आहे. मागील 24 तासांत 7 हजार 600 नवे रुग्ण सापडले आहेत. प्रांतातील बाधितांचा आकडा 50 हजारांपेक्षा अधिक झाला आहे. तर बळींचे प्रमाण 9 हजारांहून अधिक झाले आहे. कॅलिफोर्निया हा अमेरिकेतील तिसरा सर्वाधिक संक्रमित प्रांत आहे.
ब्रिटन : निर्बंध कायम

ब्रिटनमध्ये सद्यस्थितीत निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत. शनिवारपासून निर्बंध शिथिल करण्याची योजना होती, परंतु रुग्ण वाढल्याने ही योजना लांबणीवर पडली आहे. महामारीपासून बचावाचे नियम 2 आठवडय़ांपर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली आहे. ब्रिटनच्या काही हिस्स्यांमध्ये नवे रुग्ण सापडले आहेत. कुठल्याही धोक्यापासून वाचण्यासाठी तयार रहावे लागणार असल्याचे जॉन्सन यांनी म्हटले आहे.
पेरू : आणीबाणी वाढली

पेरूच्या सरकारने वाढता संसर्ग पाहता आणीबाणी 31 ऑगस्टपर्यंत वाढविली आहे. राष्ट्रपती मार्टिन विजकारा यांनी याच्याशी संबंधित आदेश प्रसारित केला आहे. आणीबाणीदरम्यान लोकांचे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सुरक्षेच्या घटनात्मक अधिकारांच्या वापरावर बंदी राहणार आहे. रात्री 10 ते सकाळी 4 वाजेपर्यंत देशात संचारबंदी राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
चीन : 45 नवे रुग्ण

चीनमध्ये दिवसभरात 45 नवे रुग्ण सापडले असून यातील 39 स्थानिक संसर्गाशी संबंधित आहेत. 31 रुग्ण शिनजियांग तर 8 जण लियाओनिंग प्रांतात सापडले आहेत. दिवसभरात तेथे कोरोना संसर्गामुळे कुणाचाच मृत्यू झालेला नाही. एक दिवसापूर्वी 127 नवे रुग्ण सापडले होते, यातील 112 रुग्ण शिनजियांग प्रांतातील होते.
ब्राझील : संसर्ग वाढताच

ब्राझीलमध्ये 24 तासांत 52 हजार 383 नवे बाधित सापडले आहेत. याचबरोबर एकूण रुग्णसंख्या वाढून 26,66,298 झाली आहे. देशातील मृतांचा आकडा 92,568 झाला आहे. आतापर्यंत 18 लाखांहून अधिक बाधितांना संसर्गापासून दिलासा मिळाला आहे.
अर्जेंटीना : टाळेबंदी वाढली

अर्जेंटीना सरकारने 16 ऑगस्टपर्यंत टाळेबंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडीज यांनी याची घोषणा केली आहे. राजधानी ब्यूनॉस आयर्समध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले असून अन्य ठिकाणीही संसर्ग वाढत आहे. अशा स्थितीत टाळेबंदी शिथिल केली जाऊ शकत नाही, असे फर्नांडीज यांनी म्हटले आहे. देशात 20 मार्च रोजी टाळेबंदी लागू करण्यात आली होती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे.
दक्षिण कोरियात कारवाई

दक्षिण कोरियात शिंचेओंजी चर्चचा प्रमुख आणि ख्रिस्तियन नेता मॅन ही याला शनिवारी अटक करण्यात आली आहे. ली याच्यावर देशातील संसर्ग रोखण्याच्या शासकीय प्रयत्नांमध्ये अडथळा आणल्याचा आरोप आहे. फेब्रुवारीमध्ये त्याच्या चर्चशी निगडित 4 हजारांपेक्षा अधिक जण कोरोनाबाधित आढळून आले होते. ली याने सरकारला चर्चमध्ये आलेल्या लोकांच्या संख्येविषयी योग्य माहिती दिली नव्हती. परंतु मार्च महिन्यात त्याने स्वतःच्या चुकीसाठी माफी मागितली होती.
रशियात ऑक्टोबरपासून व्यापक लसीकरण

जगभरात कोरोनावरील लसीची प्रतीक्षा केली जात आहे. कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरातील देश लस विकसित करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. याचदरम्यान कोरोनावरील लसीची चाचणी करणाऱया रशियाने एक मोठा दावा केला आहे. ऑक्टोबरपासून लोकांना व्यापक स्तरावर कोरोनाची लस देण्याची तयारी रशिया करत आहे.
रशियात ऑक्टोबरमध्ये कोरोना विषाणूच्या विरोधात सामूहिक लसीकरण मोहीम सुरू करण्याची तयारी केली जात असल्याचा दावा रशियाचे आरोग्य मंत्री मिखाइल मुराशको यांनी शनिवारी केला आहे. आरोग्यमंत्र्यांनी कोरोना विरोधातील लसीकरणासंबंधी अधिक माहिती देणे मात्र टाळले आहे. डॉक्टर्स आणि शिक्षकांना सर्वप्रथम कोरोनावरील लस दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
रशियाची पहिली संभाव्य कोरोना लस एका संशोधन केंद्राकडून विकसित करण्यात आली आहे. ही लस ऑगस्ट महिन्यात सादर केली जाऊ शकते. या लसीसंदर्भात नियोजन आखण्याचे काम रशियाकडून केले जात असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.
10 ऑगस्टपर्यंत लस येणार
काही दिवसांपूर्वी रशियासंबंधी महत्त्वाची माहिती समोर आली होती. उपलब्ध माहितीनुसार रशियाने जगातील पहिली कोरोनावरील लस आणण्याची योजना आखली आहे. जगातील अनेक देश कोरोना विरोधातील युद्ध लढत असताना रशिया 10 ऑगस्टपर्यंत जगातील पहिल्या कोरोनावरील लसीला मंजुरी मिळवून देण्याच्या प्रयत्नात असल्याचे सीएनएन या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. रशियाने या लसीकरता विशेष व्यूहनीती तयार केली आहे.
आश्चर्यकारक आघाडी
सोव्हिएत संघाकडून जगातील पहिल्या उपग्रहाच्या 1957 च्या प्रक्षेपणाचा उल्लेख करत रशियाच्या संप्रभू निधीचे प्रमुख किरिल दिमित्रिव यांनी हा एक विशेष क्षण असल्याचे म्हटले आहे. रशियाचा संप्रभू निधी (सोव्हरीन वेल्थ फंड) कोरोना लसीच्या प्रकल्पाला वित्तपुरवठा करत आहे. स्पुतनिकच्या बीपिंगविषयी ऐकल्यावर अमेरिकेला आश्चर्य झाले होते. कोरोना लसीसंबंधी असेच घडणार आहे. रशिया सर्वप्रथम लस उपलब्ध करणार असल्याचे किरिल यांनी म्हटले आहे.









