क्वेटामध्ये झाला हल्ला -2 सैनिक जखमी
वृत्तसंस्था/ क्वेटा
पाकिस्तानी सैन्याला बलूच संघटनांनी मोठा झटका दिला आहे. बलूच संघटनेच्या सदस्यांनी एक बॉम्बस्फोट घडवून आणत पाकिस्तानी सैन्याच्या प्रंटियर कोरचे एक वाहन उडविले आहे. या स्फोटात 4 सैनिक मारले गेले असून दोन जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानात प्रतिबंधित असलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली आहे.

पाकिस्तानी सैनिकांच्या वाहनाला सफर बाश भागात लक्ष्य करण्यात आले आहे. हे सैनिक वाहनातून गस्त घालण्यासाठी निघाले होते, याचदरम्यान आयईडी सफोट झाला. हल्ल्याची माहिती मिळताच पाकिस्तानच्या सैन्याकडून अतिरिक्त तुकडय़ा पाठविण्यात आल्या.
चिनी प्रकल्पांना तीव्र विरोध
जखमी पाकिस्तानी सैनिकांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत सैनिकांमध्ये एक कॅप्टन आणि लेफ्टनंट सामील आहे. यापूर्वी शुक्रवारी अवरान जिल्हय़ात झालेल्या हल्ल्यात दो सैनिकांचा मृत्यू झाला होता. तर 5 जण जखमी झाले होते. बलूच संघटना बलुचिस्तानातील चिनी प्रकल्पांना तीव्र विरोध करत आहेत. याचमुळे त्यांच्याकडून पाकिस्तानी सैन्य आणि चीनच्या नागरिकांना लक्ष्य करण्यात येत आहे. क्षेत्रफळानुसार बलुचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. तर लोकसंख्येत बलूच समुदायाचे प्रमाण केवळ 9 टक्के आहे. मागील अनेक दशकांपासून बलूच समुदायाकडून स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.
चीन अस्वस्थ
बलुचिस्तानात स्वतंत्र देशाची मागणी कमजोर पडू लागली असतानाच पाकिस्तानच्या सैन्याने चीनची मर्जी संपादन करण्यासाठी दडपशाही सुरू केल्याने हिंसेला पुन्हा सुरुवात झाली आहे. या हिंसेमुळे सीपीईसीवरून चीनचा विश्वास डळमळीत झाला आहे. 2018 मध्ये कराची येथील चिनी वाणिज्य दूतावास आणि 2019 मध्ये ग्वादार येथली पर्ल हॉटेलवरील हल्ल्यामुळे चीनच्या चिंतेत वाढ झाली आहे. हे हॉटेल चीननेच निर्माण केले असून यात चिनी नागरिकांचे वास्तव्य असते. याचबरोबर बलूच संघटनांनी चीनकडून संचालित कराची स्टॉक एक्सचेंजवरही हल्ला चढविला होता.









