ग्वादार नव्हे आता कराची येथे हलविणार सीपीईसीचे मुख्य केंद्र
वृत्तसंस्था / कराची
पाकिस्तानातील अशांत बलुचिस्तान प्रांतात बलूच संघटनांच्या हल्ल्यांमुळे घाबरलेल्या चीन आणि पाकिस्तानने ग्वादार बंदराला चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचे केंद्र करण्याची योजना सोडून दिली आहे. चीनचा सीपीईसी प्रकल्प त्याच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाचा हिस्सा आहे. चीन आणि पाकिस्तानदरम्यान आता कराची बंदर विकसित करण्याच्या योजनेवर अलिकडेच स्वाक्षरी झाली आहे. कराची हे शहर सिंध प्रांताची राजधानी असून पाकिस्तानच्या आर्थिक घडामोडींचे मुख्य केंद्र आहे.

चीन सुमारे 3.5 अब्ज डॉलर्स या प्रकल्पावर खर्च करणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत कराची बंदराचा विस्तार, मासेमारीसाठी एका अन्य बंदराची निर्मिती आणि 640 हेक्टर क्षेत्रात व्यापारविषयक भागाची स्थापना करणे सामील आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यानी कराचीला सीपीईसीत सामील करण्याच्या निर्णयाला ‘गेमचेंजर’ ठरविले आहे.
पण प्रत्यक्षात ग्वादार बंदर चीनसाठी मोठे संकट ठरले होते. ग्वादार हे बंदर बलुचिस्तान प्रांतात आहे. चिनी नागरिक आणि त्याच्या गुंतवणुकीवर बलूच संघटनांकडून हल्ले करण्यात येत होते. ऑगस्ट महिन्यात चिनी वाहनाला लक्ष्य करत एक आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. यात दोन मुलांचा मृत्यू झाला होता. तर 3 जण जखमी झाले होते. चीनच्या प्रकल्पाला स्थानिक बलूच समुदायाचा तीव्र विरोध आहे.
चीनच नव्हे तर सौदी अरेबिया देखील ग्वादार येथील स्वतःचा तेलशुद्धीकरण प्रकल्प कराचीला हलविणार आहे. सौदी अरेबिया 10 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीद्वारे कराचीत हा प्रकल्प उभारणार आहे. सौदीच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला होता. पाकिस्तान सरकार ग्वादारला ऊर्जेचे मुख्य केंद्र म्हणून विकसित करू पाहत होते. आता ग्वादारमधून चीन देखील स्वतःचा गाशा गुंडाळू पाहत आहे.सीपीईसी चीनच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक ठरावे अशी ड्रगनची इच्छा आहे. चीनने आता ग्वादारऐवजी कराचीला विकसित करण्याचा करार केला असला तरीही याची अंमलबजावणी करणे अत्यंत अवघड ठरणार आहे. कारण हा प्रकल्प सुरू करण्यासाठी कांदळवने नष्ट करावी लागणार आहेत. तसेच सुमारे 5 लाख लोकांचे स्थलांतर करावे लागेल.









