बेळगाव परिसरात संभाजी महाराजांचे कार्य युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश प्रशंसनीय : चांगली पिढी घडण्याचा विश्वास
प्रतिनिधी /बेळगाव
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव आजच्या तरुण पिढीला व्हावी, या उद्देशाने संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो. बेळगाव परिसरात बलिदान मासला तरुणांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गल्लोगल्ली, गावोगावी युवक मुंडण करून पायात चप्पल न घालता बलिदान मासचे आचरण करत आहेत. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे कार्य आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचत आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला मोगलांनी कैद केले. या पराक्रमी राजाला कैद करून हाल हाल करत एक एक अवयव काढण्यात आला. तब्बल 40 दिवस त्यांना मरण यातना सहन कराव्या लागल्या. अखेर फाल्गुन अमावास्येला संभाजी महाराजांचे निधन झाले. हे 40 दिवस धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळले जातात. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे मोठय़ा प्रमाणात बलिदान मासचे आचरण करता आला नसले तरी यावषी मात्र मोठय़ा संख्येने युवक एकत्रित येऊन बलिदान मासचे आचरण करीत आहेत.
बलिदान मासमुळे युवा पिढीत परिवर्तन

छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी दिलेले बलिदान आजही युवकांना माहीत नाही. गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींनी युवा पिढीला बलिदान म्हणजे काय? हे माहीत व्हावे यासाठी धर्मवीर बलिदान मास पाळण्यास सुरुवात केली. संभाजी महाराजांनी 40 दिवस ज्या मरण यातना भोगल्या त्या बलिदान मासमुळे युवा पिढीपर्यंत पोहोचून परिवर्तन होत आहे.
किशोर लाड (मच्छे)
आवडता अन्नपदार्थ 40 दिवस वर्ज्य

बलिदान मास पाळण्यासाठी काही तरुण मुंडण करून घेतात. दररोज सायंकाळी ज्या ज्या ठिकाणी शिवमूर्ती आहेत, त्या त्या ठिकाणी अथवा मंदिरांमध्ये श्लोक पठण केले जाते. काही युवक पायात चप्पल घालत नाहीत. आपल्याला आवडता एखादा अन्नपदार्थ 40 दिवस वर्ज्य केला जात आहे.
बाबुराव किल्लेकर (कणबर्गी)
ग्रामीण भागात तरुणांमध्ये उत्साह

बेळगाव शहरासह ग्रामीण भागात तरुणांमधील उत्साह वाढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ावरून झालेले राजकारण यामुळे यावषी बलिदान मासला उपस्थितांची संख्या वाढली आहे. प्रत्येक गल्लोगल्ली, गावागावात तरुण-तरुणी बलिदान मास पाळत आहेत. पूर्वी 5 ते 10 असणारी धारकऱयांची संख्या आता 200 वर पोहोचली आहे
बाळू गुरव (केदारवाडी)
चांगली पिढी निश्चितच घडणार

छत्रपती शिवाजी-संभाजी महाराज आपल्या मातीत जन्माला आले तरी त्यांची माहिती युवकांना नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे घराघरात शिवचरित्र पोहोचावे, अशी भिडे गुरुजींची शिकवण आहे. व्यसनाधिनतेकडे वळलेल्या पिढीला शिवकार्य समजले तर चांगली पिढी निश्चितच घडणार आहे. त्यामुळे युवकांनी बलिदान मासचे आचरण करावे.
संदेश बाणेकर (सावगाव)









