एकतर्फी विजयासह दिल्लीसाठी प्ले-ऑफच्या आशा कायम
नवी मुंबई / वृत्तसंस्था
मिशेल मार्श (62 चेंडूत 89) व डेव्हिड वॉर्नर (41 चेंडूत नाबाद 52) यांच्या धमाकेदार अर्धशतकाच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सला 8 गडी राखून नमवत आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवला. राजस्थानने अश्विन-पडिक्कलच्या फटकेबाजीमुळे 20 षटकात 6 बाद 160 धावा केल्या. मात्र, प्रत्युत्तरात दिल्लीने 18.1 षटकात 2 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले.
मोक्याच्या क्षणी काही उत्तम जीवदाने मिळालेल्या मार्शने 62 चेंडूंच्या खेळीत 143.54 च्या स्ट्राईक रेटने 5 चौकार व 7 उत्तुंग षटकार फटकावले तर डावखुऱया डेव्हिड वॉर्नरने देखील 5 चौकार व 1 षटकार वसूल केले. प्रारंभी, केएस भरत शून्यावर बाद झाल्याने दिल्लीची खराब सुरुवात झाली. पण, वॉर्नर व मिशेल मार्श यांनी दुसऱया गडय़ासाठी 144 धावांची भागीदारी साकारत संघाला विजयाच्या उंबरठय़ावर आणले. मार्शला चहलने सेनकरवी झेलबाद केले. पण, तोवर दिल्लीचा विजय सुनिश्चित झाला होता. रिषभ पंतने 4 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 13 धावा फटकावत संघाला विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले.
अश्विनचे तडाखेबंद अर्धशतक
अव्वल दर्जाच्या फलंदाजांपेक्षा अधिक स्ट्राईकरेटने फलंदाजी करत रविचंद्रन अश्विनने टी-20 क्रिकेटमध्ये आपले पहिले अर्धशतक साजरे केले, ते राजस्थानच्या डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. अश्विनने 38 चेंडूत 50 धावांची आतषबाजी केली तर देवदत्त पडिक्कलने 30 चेंडूत 48 धावा फटकावल्या.
खलील अहमदऐवजी स्थान लाभलेल्या डावखुरा मध्यमगती गोलंदाज चेतन साकरियाने (2-23) राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरला (7) डावातील तिसऱयाच षटकात स्वस्तात बाद केले. इनफिल्डवरुन मारण्याच्या प्रयत्नात बटलरने शार्दुल ठाकुरकडे सोपा झेल दिला. बटलरला स्वस्तात बाद करता आल्याने दिल्लीला राजस्थानवर वर्चस्व राखण्याची नामी संधी लाभली आणि याचा त्यांनी पुरेपूर लाभही घेतला. राजस्थानला पॉवर प्लेमध्ये 6 षटकात 1 बाद 43 धावा जमवता आल्या.
मागील सामन्यात तडाखेबंद अर्धशतक झळकावणाऱया यशस्वी जैस्वालने ऍनरिच नोर्त्झेला (2-39) अप्रतिम ऑन-ड्राईव्हचा चौकार व नंतर थर्डमॅनकडे षटकारासाठी फटकावत उत्तम सुरुवात केली. मात्र, नंतर मिशेल मार्शने (2-25) बाऊन्सरवर त्याची खेळी संपुष्टात आणली. पुढे डावखुरा देवदत्त पडिक्कल अश्विनच्या साथीला क्रीझवर आला. अश्विनने 38 चेंडूत आक्रमक अर्धशतक साजरे केले. मात्र, मार्शने त्यानंतर लगेच अश्विनची खेळी संपुष्टात आणली.
पडिक्कलने अक्षर पटेलला डीप बॅकवर्ड पॉईंट व लाँगऑनच्या दिशेने 2 षटकार खेचल्यानंतर राजस्थानचा संघ वर्चस्व राखण्याच्या दिशेने मार्गोत्क्रमण करण्याची शक्यता निर्माण झाली. पडिक्कलने मार्शला सलग दोन चौकार फटकावत आपले इरादे स्पष्ट केले. मात्र, नोर्त्झेने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला (6) मिडविकेटवरील शार्दुल ठाकुरकरवी झेलबाद केले. झेल घेण्याच्या प्रयत्नात डावा हात दुखावल्याने कुलदीप यादवला काही काळ मैदानाबाहेर जावे लागले.
रियान परागने नोर्त्झेला उत्तुंग षटकार खेचला. पण, नंतर साकरियाने त्याची खेळी संपुष्टात आणली. पडिक्कलला बदली खेळाडू कमलेश नागरकोटीने अप्रतिम झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स ः 20 षटकात 6 बाद 160 (रविचंद्रन अश्विन 38 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह 50, देवदत्त पडिक्कल 30 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 48, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन 10 चेंडूत नाबाद 12, बोल्ट नाबाद 3. अवांतर 6. चेतन साकरिया, मिशेल मार्श, ऍनरिच नोर्त्झे प्रत्येकी 2 बळी).
दिल्ली कॅपिटल्स ः 18.1 षटकात 2 बाद 161 (मिशेल मार्श 62 चेंडूत 5 चौकार, 7 षटकारांसह 89, डेव्हिड वॉर्नर 41 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारांसह नाबाद 52, रिषभ पंत 4 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 13. अवांतर 7. ट्रेंट बोल्ट 1-32, यजुवेंद्र चहल 1-43).









