एएफसी चॅम्पियन्स लीग स्पर्धेत इराणच्या पर्सपोलीसची विजयी सलामी
क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेला एफसी गोवा आणि कतारच्या अल-रय्यान एफसी यांच्यातील लीग सामना गोलशून्य बरोबरीत संपला. हा सामना बुधवारी रात्री 10.30 वाजता खेळविण्यात आला. एफसी गोवाने प्रथमच या स्पर्धेत खेळताना आपल्यापेक्षा प्रबळ असलेल्या संघाला चांगली झुंज दिली. या निकालाने एफसी गोवा आणि अल-रय्यान संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. दुसऱया सत्रात अल-रय्यानने नैफ हादराजी, प्रँक कोम आणि इब्राहिम यांना वगळून अब्दुरेहमान अल-हराजी, अब्दुरेहमान अल-कोर्बी आणि मौफानक अवाद यांना संधी दिली. मात्र एफसी गोवाच्या भक्कम बचावापुढे त्यांना गोल करता आला नाही. सॅरिटोन फर्नांडिस, जेम्स डोनीची, सॅन्सन परेरा आणि आयव्हन गोन्साल्वीसने कालच्या सामन्यात बचावात चांगली कामगिरी केली. एफसी गोवाने प्रतिस्पर्धी संघावर काही आक्रमणेही केली. या सामन्यात एफसी गोवाला चार कॉर्नरही मिळाले. त्यापूर्वी प्रकाशझोतात खेळविण्यात आलेल्या सामन्यात इराणच्या पर्सपोलीस संघाने अबूधाबीच्या अल-वाहदा फुटबॉल क्लबचा एकमेव गोलने पराभव केला. सामन्याच्या पहिल्या सत्रातील 40व्या मिनिटाला या विजयी गोलची नोंद डिफेंडर जलाल होसेन्नी याने मितोराबीने दिलेल्या पासवर केली. या विजयाने पर्सपोलीस संघाला तीन गुण प्राप्त झाले. आता 17 एप्रिल रोजी एफसी गोवाचा दुसरा लीग सामना अल-वाहदा फुटबॉल क्लबशी रात्री 8 वाजता तर रात्री 10.30 वाजता अल-रय्यान एफसी आणि इराणच्या पर्सपोलीस एफसी संघात सामना होईल.








