श्रीकृष्णाने शतधन्व्याचा वध केला व तो त्याच्या रक्ताने माखलेल्या वस्त्रालंकारात स्यमंतकमणी शोधू लागला. वास्तविक सत्राजिताचा वध केल्यावर पळविलेला स्यमंतकमणी शतधन्व्याने अक्रूरापाशी दिलेला आहे, हे सर्वांचे अंतरंग जाणणारा कृष्ण जाणत होता. पण त्याने बलरामाच्या समजुतीसाठी मणी शोधण्याचे नाटक मात्र केले.
मणि न लभे त्या परवंटी । अथवा कोठें वसनगांठी। मग परतोनियां जगजेठी । करी गोठी ज्ये÷ापें । वृथा शतधनु वधिला पाहीं । मणि सर्वथा यापें नाहीं । हें ऐकोनि बळराम काया । बोले हृदयीं तर्कूनी ।
कृष्ण बलरामाला म्हणाला-या शतधन्व्याच्या वस्त्रालंकारात स्यमंतकमणी काही सापडला नाही. मी उगीचच शतधन्व्याला मारले वाटते.
बळराम तर्कीं अभ्यंतरिं । म्हणे हा सर्वज्ञही श्रीहरि।
रहस्य चोरूनियां वरिवरी । प्राकृतापरी समजावी ।त्यानन्तरें कृष्णासि म्हणे । बहुतेक मणि शतधन्व्यानें । कोणा पुरुषापाशीं यत्नें । ठेविला भेणें पुरगर्भीं । यास्तव जाऊनि द्वारकापुरिं । मणिअन्वेषण बरवें करिं । ऐसी बोलूनियां वैखरी । रामें मुरारि विसर्जिला ।आणिक कृष्णासी काय म्हणे । कुरुनृपा तें ऐकें श्रवणें । अभेदीं भेदाचें संभवणें । ऐसें करणें कळीकाळें ।
कृष्णाच्या म्हणण्यावर बलरामाने मनात विचार केला. हा श्रीहरी तर सर्वज्ञ आहे. काय घडले आहे आणि स्यमंतकमणी नेमका कुठे आहे हे याला चांगलेच माहीत आहे. पण हा मनुष्य देहातील लीला करत असल्याने असे बोलतो आहे. मग तो कृष्णाला म्हणाला-शतधन्व्याने बहुधा हा स्यमंतकमणी दुसऱया कोणाकडेतरी ठेवायला दिला असावा. याचा शोध तू द्वारकेत जाऊन घे.
बलराम म्हणे सर्वज्ञ हरि । साक्षी सर्वांचे अंतरिं। शाधनुर्हननें मणीची चोरी । किमर्थ परिहरी मजसीं हा । ऐसा विकल्प धरूनि मनीं । कृष्णा आज्ञापिलें वचनीं । म्हणे जाऊनि द्वारकाभुवनीं । शोधिजे मणि सुविचारें। माझा प्रियत्तम विदेहनपति । तद्दर्शनीं मजला आर्ति। समीप मिथिलानरप्रान्तीं। सहजस्थिती आलोंसों । विदेह देखावयाकारणें । मिथिलेमाजि मजला जाणें। इतुकें बोलोनि संकर्षणें। केलीं प्रयाणें परस्परें ।
सर्वज्ञ असून कृष्णाने स्यमंतकमणी कुठे आहे याबद्दल बलरामाजवळ जे अज्ञान प्रकट केले, ते बहुधा बलरामाला आवडले नाही. म्हणून त्याने कृष्णाला द्वारकेत जाऊन स्यमंतकमणी शोधण्याची आज्ञा केली व पुढे त्याला म्हणाला – मिथिलाधिपती माझा चांगला मित्र आहे. मी एथवर आलोच आहे. तरी मी आता त्याची भेट घ्यायला जातो, तू मात्र द्वारकेला परत जा. असे म्हणून त्याने कृष्णाचा निरोप घेतला.
त्यातें देखोनि अकस्मात। पुढें धांविला मिथिलानाथ । मनोल्लासें प्रीतिवंत । आनंदभरित हृतकमळीं। क्षेमालिङ्गन स्नेहाभिवृद्धि। स्वागत पुसोनि यथाविधि । दिव्यासनीं ईश्वरबुद्धी । पूजिता जाला सप्रेमें । करूनि पादावनेजन । तीर्थ सर्वत्र संप्रोक्षून । भावें हृदयीं धरिले चरण । मूर्ध्नि स्पर्शोनि स्थापिले ।बद्धाञ्जलि विदेहनृपति । उभा ठाकोनि किङ्करवृत्ति । बळरामातें करी विनति । म्हणे विश्रान्ति मज दिधली ।
देवदत्त परुळेकर








