वृत्तसंस्था/ बर्लीन
सध्या पॅरिसमध्ये सुरू असलेल्या प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत जपानच्या नाओमी ओसाकाला वादग्रस्त निर्णयानंतर माघार घ्यावी लागली होती. आता पुढील आठवडय़ात होणाऱया डब्ल्यूटीए टूरवरील बर्लीन खुल्या महिलांच्या ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेतून ओसाकाने माघार घेतली आहे, अशी माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.
जपानच्या ओसाकाने काही दिवसासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याने तिने बर्लीन स्पर्धेत आपण सहभागी होवू शकणार नसल्याचे स्पर्धा आयोजकांना कळविले आहे. बर्लीन टेनिस स्पर्धा 14 जूनपासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे 28 जूनपासून सुरू होणारी विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा आणि त्यानंतरच्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी ओसाकाच्या सहभागाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. प्रेंच टेनिस स्पर्धेत 23 वर्षीय ओसाकाने पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्यास नकार दर्शविल्याने प्रेंच टेनिस फेडरेशनने ओसाकाला 15000 डॉलर्सचा दंड केला होता. नंतर ओसाकाने प्रेंच टेनिस स्पर्धेतून माघार घेतली होती.









