संतोषचा डमी नितीनने तीन वर्षांपूर्वीच बायकोला केले होते ठार, प्रेयसीचा 10 दिवसांपूर्वी ठेचून खून, गुन्हय़ांची दिली कबुली
वार्ताहर, विशेष प्रतिनिधी /
भुईंज, सातारा :
सलग सहा खून करुन मागमूस लागू न देणाऱ्या वाई तालुक्यातल्या ‘डॉ. संतोष पोळ’ प्रकरणाने साऱ्या महाराष्ट्रात हडकंप माजला. अत्यंत शातिर बुद्धीच्या संतोष पोळला बेड्या ठोकल्याची तारिख 11 ऑगस्ट 2016 ही होती. बरोबर 5 वर्षे उलटत असताना याच तारखेला याच तालुक्यात ‘डॉ. संतोष पोळ’ प्रकरणाचा सिकवल घडून आला. उसाच्या शेतात प्रेयसीचा गळा दाबत वार करुन खून करणारा नराधम नितीन गोळे बरोबर याच तारखेला म्हणजे 11 ऑगस्ट 2021 ला पोलिसांच्या हाती लागला. एन्ट्रोगेशनमध्ये प्रेयसीलाच काय तीन वर्षापूर्वी बायकोलाही मारुन ओढ्यात पुरल्याचे त्याने सांगताच तपासी अधिकाऱ्यांचे होश उडाले. संतोष पोळ खूंकार-खतरनाक होता. पण नितीन गोळे आतल्या गाठीचा असल्याने सातारा पोलिसांना यानेही घाम फोडला आहे.
दरम्यान, प्रेयसीच्या मृतदेहाबरोबरच तीन वर्षापूर्वी खोल ओढ्यात पुरलेल्या बायकोचा सांगाडा पोलिसांनी उकरुन काढला असून संतोष पोळ प्रमाणेच नितीन गोळे प्रकरण पण तितकेच गुंतागुंतीचे अन् क्राईमच्या दुनियेला थक्क करणारे आहे.

तत्कालीन पोलीस अधिक्षक संदीप पाटील व एलसीबीच्या पद्माकर घनवट यांनी शोधून काढलेल्या संतोष प्रकरणाच्या आठवणी आजही सातारा जिल्हय़ाच्या अंगावर शहारे उभे करत असतानाच त्याच तारखेला आणखी एक क्रूरकर्मा आपल्यातच वावरत होता हे समजल्याने वाई तालुक्याचे जनमाणस घबराहटीत गेले आहे. नव्याने सापडलेल्या नितीन गोळे प्रकरणाची धागेदोरे इथेच संपलेत की अजूनही खोलवर आहेत यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त एस. पी. धिरज पाटील, भुईंजचे तपासी अधिकारी आशिष कांबळे यांनी एकुणएक शक्यता तपासायला सुरुवात केली आहे.
संध्या शिंदे बेपत्ता झाल्याने प्रकरणाची झाली सुरुवात
कारी (ता. सातारा) येथील संध्या विजय शिंदे बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या भावाने शहर पोलिसांत दिली होती. संध्याचा पती व्यसनी असल्याने कुटुंबाची जबाबदारी संध्यावरच होती. केटरिंगच्या कामाला जात असतानाच नितीन गोळेची झालेली ओळख पुढे संबंधात बदलली.
दरम्यान, मंगळवार 3 ऑगस्ट रोजी आसले (ता. वाई) येथील उसात एक मृतदेह सापडला होता. आधारकार्ड व कागदपत्रांच्या तपासणीवरुन मृतदेह संध्याचा असल्याची खात्री झाली. अधिक तपास केला असता संध्या आणि नितीन गोळे यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे सहाय्यक निरीक्षक आशिष कांबळे यांना लक्षात आले.
नितीनचा पोलिसांच्या हाताला हिसडा
पोलीस तपास नितीन गोळेवर रोखला गेला. मात्र ‘नाकावरची माशी न उठणारा’ अशी त्याची सध्या गावात ख्याती आहे. पूर्वी मिल्ट्री भरती झालेला मात्र सैन्याची नोकरी अर्धवट सोडून पळून आलेला नितीन अंगापिंडांने तसा दणकट मात्र सध्या त्याचा स्वभाव शामळू होता. अडीच एकर शेती आणि साताऱ्यात हमाली अशा कामात तो मश्गुल होता. भावकीत पटत नसल्याने गावात त्याचा सवतासुभा होता.
नितीनला पकण्यासाठी पोलिसांनी ट्रप रचला, मात्र ऐन वक्ताला घात झाला. शामळू नितीनने ऐनवेळी भरतीसाठीची कसरत दाखवली. पोलिसांना हिसडा दिला आणि अंधाराचा फायदा घेवून डोंगराच्या दिशेने सरताळे गावच्या बाजूने पळाला. मध्यरात्र उलटल्यानंतर कदाचित तो महामार्गावर आला आणि महामार्गावरुन त्याने बेळगाव गाठले. तपासात तो कर्नाटक आणि केरळ राज्याच्या मध्यवर्ती असल्याचे कळत होते. मात्र आशिष कांबळेंनी मोबाईल लोकेशनवरुन तो बेळगावात असल्याची खात्री केली.
भुईंज पोलिसांना सॅल्युट
महामार्ग अपघातात व्यस्त असलेल्या भुईंज पोलिसांच्या म्हणजे आशिष कांबळेंच्या टिमने सॅल्युट ठोकावी अशीच कामगिरी केली. रविराज वर्णेकर, प्रसाद दुदुस्कर, तुकाराम पवार, अतुल आवळे, शिवाजी तोरडमल, आनंदराव भोसले, बापूराव धायगुडे, प्रियांका कदम, दिपाली गिरीगोसावी यांनी बरोबर बेळगावात साध्या वेशात त्यास दि. 10 रोजी उचलला अन् भुईज पोलीस ठाणे दाखवले.
एन्ट्रोगेशनमध्ये क्रूरकर्माचा नकाब उठला
नितीन गोळेच्या चलाखीचा अंदाज घेवून अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील यांची तपास कामात एन्ट्री झाली. संध्या शिंदे (वय 32) हिचे अन्य तिसऱयाच व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय नितीनच्या डोक्यात घोळत होता. स्वतःच्या संबंधाला योग्य ठरवून संध्याच्या वागण्यावर पराकोटीच्या वैतागलेल्या नितीन गोळेने तिचा खून केल्याने त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेण्याची सातारा पोलिसांनी पराकाष्टा केली. यात त्याच्या कुटुंबात दोन मुले, आई व बहीण आहे. बायकोचा जानेवारी महिन्यात खून करुन नंतर या क्रूरकर्म्याने स्वतः वाई पोलिसांत 1 मे 2019 रोजी मिसींग झाल्याची तक्रार होती. नितीनच्या व्याजवाडी गावातून ती मिसींग गेली नाही. माहेरी गेली नाही आणि आजवर सापडली नाही याचा छडा लावताना नितीन गोळेने पत्नीच्या अनैतिक संबंधाचा संशय आपल्या डोक्यात होता आणि त्यातूनच अडीच वर्षापूर्वीच तिला गळा दाबून खल्लास केल्याचे त्याने कबूल केले.
व्याहळी, व्याजवाडीला पोलीस छावणीचे स्वरुप
भुईंज पोलीस ठाण्यात एकच पोलीस कर्मचारी उरले होते. सर्वच पोलीस कर्मचारी या मोहिमेवर गुरुवारी होते. गुरुवारी दिवसभर नितीन गोळे याने पुरलेला मृतदेह शोधण्याचे काम सुरु होते. त्यासाठी वाईचे पोलीस, मुख्यालयातील पोलीस असा मोठा बंदोबस्त व्याहळी आणि व्याजवाडीत होता. त्युमळे पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.
भुईंज पोलिसांची कामगिरी अभिमानास्पद
भुईंज पोलीस हे ज्यादिवशी संध्या शिंदेचा खून झाला त्या दिवशीच आरोपीपर्यंत पोहचले होते. मात्र आरोपी इतका खतरनाक व पोहचलेला असेल असे पोलिसांना वाटलेच नव्हते.भुईंज पोलिसांनी चौकशीकामी हात घातला पण दैव बलवत्तर म्हणुन भुईंज पोलिसांतील एकजन अक्षरशः वाचला मात्र जिद्द न सोडता सपोनि आशिष कांबळे, शंकरराव घाडगे, रविराज वर्णेकर, प्रसाद दुदुस्कर यांनी आरोपीला जेरबंद केल्याशिवाय पर्यायच नसल्याचा चंग बांधत व रात्रीचा दिवस करीत तीन राज्य ओलांडुन आरोपीच्या मुसक्या आगदी फिल्मी स्टाईलने आवळत आरोपीस जेरबंद केले. हि बातमी कळताच भुईंज पोलिस टिमचे सर्वच क्षेत्रातुन कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत असुन वरिष्ठ अधिकारी यांनी सुध्दा भुईंज पोलिसांचे कौतुक केले आणि खरचच वरिष्ठाकडुन या धाडसी कामगिरीबद्दल जिवाची बाजी लावणाऱया भुईंज पोलिसांना रिवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येईल तोच या पोलिसांचा खरा विजय असेल.
महिला अधिकाऱ्यांच्या कर्तबगारीचेही कौतुक
नागपंचमीच्या पुर्वसंध्येला एका मृत महिलेच्या शवविच्छेदनासाठी वाईच्या उपविभागीय अधिकारी शीतल जाणवे खराड़े, नायब तहसीलदार गितांजली गरड, भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. उज्वला इंगळे, बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. योजना तराळ या चारही महिला पायपीट करीत पाच किलोमीटर घटनास्थळापर्यंत चालत गेल्या दरीत उतरून कर्तव्य पार पाडले. या बोलक्या घटनेने व्याजवाडी गावासह वाई तालुक्यात महिलांच्या कर्तबगारीचे कौतुक होत आहे.
अडीच वर्षापूर्वीच तीस फूट दरीत पुरले होते बायकोला
पत्नी मनिषाच्या अनैतिक संबंधांचा किडा नितीनच्या डोक्यात घोळत होता आणि त्यातूनच त्याने त्याचे गाव व्याजवाडी आणि जवळच असलेल्या व्याहळी गावच्या मध्ये असलेल्या ओढय़ात तिचा खून केला. ओढय़ाचे सर्वात खोल गेलेल्या तीस फुटी पात्रात खोल खड्डा काढून त्याने मृतदेह पुरून ठेवला होता. त्यामुळे तसेच त्याच्या भोळय़ा भाबडय़ा स्वभावामुळे मनिषा गोळेच्या खूनाचा तपास लागलाच नाही.
पोलिसांचे जेवणही ओढ्याच्या चिखलात
नुकताच झालेला पाऊस आणि गुरुवारी सुरू असलेली भुरभुर याची तमा न ठेवता पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, धिरज पाटील, आशिष कांबळे आणि त्यांच्या टीमने तीन वर्षापूर्वीच्या घटनास्थळाला भेट दिली. ओढय़ाचा प्रवाह सुरू होता. त्यामुळे चिखलात खोदकाम करणे अवघड होते. या साऱयावर मात करत सातारा पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू ठेवले. दुपारचे जेवणही याच ओढय़ाच्या चिखलात उभे राहून करावे लागले. अखेर दुपारनंतर अडीच वर्षापूर्वी खून झालेल्या मनिषा गोळेच्या पार्थिवाचा सांगाडा हाती लागला. हा सांगाडा अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवला जाणार आहे.









