नाशिक / प्रतिनिधी :
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी तपास सीबीआयकडे गेला हे बरे झाले. नाही तर मुंबई पोलीसांनी कितीही चांगले काम केले तरी ते कुणाला तरी वाचवत आहेत, असाच आरोप काही लोकांकडून झाला असता, असा टोला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर लावला आहे. आता हा तपास सीबीआयकडे गेल्याने सत्य लवकरच बाहेर येईल असे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय अधिकार्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, काँग्रेसचे आमदार निधी वाटपावरुन नाराज असले तरी त्यांचासोबत चर्चा करणार. एकाच पक्षाचे सरकार असले तरी त्यांच्या मतभेद असतात, त्यांचेही नेते नाराज असतात, तीन पक्षांचे सरकार असल्याने कोणीतरी नाराज होणारच. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार मजबूत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच काँग्रेस अध्यक्ष कोणी व्हावे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, अध्यक्ष कोणीही झाले तरी काँग्रेस पक्ष मोठा झाला पाहिजे, असेही मंत्री भुजबळ म्हणाले.
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात सर्व ठिकाणी ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन कोरोनाची चाचणी केल्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरी देशात नाशिकचा रुग्ण बरे होण्याचा प्रमाण चांगला असल्याचे देखील यावेळी भुजबळ यांनी सांगितले.
नाशिकचे पाणी राज्याबाहेर जाऊ देणार नाहीमागील काही काळात गोदावरी खोऱ्याचे पाणी गुजरातच्या प्रकल्पांना देण्याचे प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु महाराष्ट्रातील अनेक भाग पाण्यापासून वंचित असल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्याची तहान भागविणे आवश्यक आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पाणी महाराष्ट्राच्या बाहेर न जावू देता त्याचा फायदा महाराष्ट्राच्याच जमिनीला देणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे.








