‘आरजी’कडून अनेक प्रकरणे उघड, : आतापर्यंत 25 हजार नावे गाळली, नोव्हेंबरअखेरीस एक लाखपर्यंत नावे वगळण्याचा इशारा
प्रतिनिधी /पणजी
मताधिक्य वाढविण्यासाठी व निवडून येण्यासाठी बिगर गोमतंकीयांच्या बनावट मतांवर आता संक्रांत येणार असून रिव्होल्युशनरी गोवन्स या संघटनेने राज्यातील निवडणूक अधिकाऱयांसमोर बरीच प्रकरणे आणून आतापर्यंत सुमारे 25 हजार नावे मतदारयादीतून गाळली. नोव्हेंबरअखेरपर्यंत दिलेल्या मुदतीत सुमारे 1 लाखपर्यंत नावे गाळण्याचा इशारा या संघटनेने ठेवला आहे.
आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी या कामी पुढाकार घेतलेला आहे. संपूर्ण गोव्यात म्हणजेच 40 ही मतदारसंघात राजकीय नेत्यांनी बिगर गोमंतकीयांची नावे कोणताही ठोस पुरावा नसताना घालून घेतलेली आहेत. एका फोंडा मतदारसंघातच सुमारे 10 हजार नावे ही बिगर गोमंतकीय अल्पसंख्यांकाची आहेत. एकेका गोमंतकीय व्यक्तींच्या नावावर 50 ते 100 जणांच्या नावाची नोंद करून ठेवली आहेत. एका मतदान केंद्रावर 840 मतदारांपैकी 800 नावे ही बिगर गोमंतकीयांची आहेत. त्यांच्याकडे घराचा क्रमांक देखील नाही. काही राजकीय नेते बुथ पातळीवर निवडणूक अधिकाऱयांकडे नावाची यादी सादर करून त्यांची नावे यादीत घाला असे आदेशच देतात.
आतापर्यंत 25 हजार नावे गाळली
अनेक बुथ अधिकारी डोळे मिटून ही नावे घुसडून मोकळे होतात. मनोज परब यांच्या आरजीकडे आता सुमारे 45 हजार गोमंतकीय युवक-युवतींची नोंद झालेली आहे. 40 ही मतदारसंघातील सदस्य हे जागृत आहेत. त्यांनी बिगर गोमंतकीयांची बेकायदेशीरपणे नोंद केलेल्या नावाची यादी तयार करून दिली व त्यासाठीचे पुरावे सादर केल्यानंतर निवडणूक अधिकाऱयांनी आतापर्यंत 25 हजार पेक्षा जादा नावे गाळलेली आहेत. या महिन्याअखेरपर्यंत किमान 1 लाख नावे वगळणे अधिकाऱयांना भाग पाडणार, असे ते म्हणाले.
कळंगूटमध्ये 9500 मतदार बिगरगोमंतकीय
फोंडा, मडगाव, म्हापसा, कुठ्ठाळी, नावेली (दवर्ली), सांताक्रूझ (इंदिरानगर), ताळगाव, थिवी, वाळपई इत्यादी मतदारसंघातील सर्वेक्षणात धक्कादायक व आश्चर्यकारक माहिती मिळाल्याचे मनोज परब यांनी सांगितले. एका कळंगूट मतदारसंघात 9500 मतदार हे गोव्याबाहेरील आहेत. थिवीमध्ये 5 हजार तर वाळपई मतदारसंघात वाळपईत 3000 आणि उसगावात सुमारे 5 हजार बिगर गोमंतकीयांची नोंद करून ठेवलेली आहे. आम्ही आता स्वतः फिल्टर बसविलेला असून निवडणूक आयोगाला सुमारे 1 लाख बेकायदेशीर मतदारांची नावे वगळणे भाग पाडले, असे मनोज परब म्हणाले.
थिवीमध्ये ‘लाला की बस्ती’
थिवी मध्ये ‘लाला की बस्ती’ नावाची एक वस्ती तयार झाली आहे. 2010 मध्ये न्यायालयाने तेथील 32 घरे बेकायदेशीर ठरवलेली त्यापायी आता 120 घरे निर्माण केली. लाला नावाच्या व्यक्तीचे सारे नियंत्रण पंचायतीवर देखील आहे. त्या वस्तीमधील एका पंचाच्या नावावर 120 मतदारांची नावे आहेत. सर्वांचा पत्ता घर क्रमांक 100. हे कसे शक्य होते, असा सवाल त्यांनी केला.
सुमारे एक लाख नावे बाहेर पडणार
प्रत्येक मतदारसंघात बिगर गोमंतकीयांच्या बेकायदा मतदारांच्या मदतीने विजयी होण्याऱया राजकीय नेत्यांचा डाव आम्ही आता उधळून लावणार, असे मनोज परब म्हणाले. शिरोडा मतदारसंघात मागील पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या आमदाराला 60 मते जास्त मिळाली होती. आता त्याच मतदारसंघातील 125 मते बाद झालेली आहेत. पुढील आठ दिवसांत सर्व मतदारसंघातील मतदार यादीचा अभ्यास पूर्ण करून आयोगासमोर आम्ही यादीच मांडून यादीतून ही बेकायदा नावे वगळण्यास भाग पाडणार आहोत. निवडणूक शुद्ध पद्धतीने होऊ द्या, असे ते म्हणाले. सुमारे 1 लाख बनावट मतदारांची नावे यादीतून बाहेर पडतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.









