आंध्रात 10 तर पंजाबमध्ये 21 जणांचा मृत्यू
चंदीगढ, अमरावती / वृत्तसंस्था
दारूच्या व्यसनापायी देशात दोन ठिकाणी घडलेल्या वेगवेगळय़ा घटनांनी 31 जणांचा बळी घेतला आहे. पंजाबमध्ये बनावट दारूचे सेवन केल्यामुळे 21 जणांचा मृत्यू झाला असून आंध्रप्रदेशात दारूऐवजी सॅनिटायझरचे सेवन केल्यामुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मद्य मिळत नसल्याने स्थानिकांनी सॅनिटायझरचे सेवन केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे.
आंध्रप्रदेशातील प्रकाशम जिल्हय़ात दारूच्या नादात गुरुवारी तिघांचा तर इतर सात जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. मृतांमधील तिघे भिकारी आहेत. गुरुवारी रात्री त्यांच्यातील दोघांनी पोटात जळजळ होत असल्याची तक्रार केली. यामधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱयाचे रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान निधन झाले. शुक्रवारी अशाचप्रकारची आणखीही काही प्रकरणे उजेडात आली. मृतांमध्ये एका 28 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. लॉकडाऊनमुळे मद्याची दुकाने सध्या बंद असल्याने संबंधित व्यक्तींनी सॅनिटायझर पिण्यास सुरुवात केली होती. पोलीस अधीक्षकांना याप्रकरणी चौकशीचा आदेश दिला आहे. तसेच पीडित फक्त सॅनिटायझर पित होते की त्यामध्ये अजून कोणते रसायन मिसळत होते याचीही माहिती पोलीस घेत आहेत.
पंजाबमधील घटनेच्या चौकशीचे आदेश पंजाबमधील तीन जिल्हय़ात बनावट दारूमुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दंडाधिकारी पातळीवर चौकशीचे आदेश दिले आहेत. पंजाबमधील अमृतसर, बटाला आणि तरण-तारण या तीन जिल्हय़ांमध्ये बुधवारपासून तब्बल 21 जण दगावले आहेत. सर्वात पहिली घटना 29 जुलैच्या रात्री अमृतसरमधील तरसिक्का तालुक्यात घडली होती. त्यानंतर आणखी दोन दिवसात आणखीही काही मद्यपींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अजूनही काही जण इस्पितळात उपचार घेत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जालंधरच्या अतरिक्त आयुक्तांना याप्रकरणी सखोल तपास करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.









