नवी दिल्ली
भारतात नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात गरिबी प्रचंड प्रमाणात वाढली आहे, असा आरोप काँग्रेसने नेहमीच केला आहे. शुक्रवारी या आरोपाच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या माहिती-तंत्रज्ञान आणि प्रसार माध्यम विभागाने काही छायाचित्रे प्रसिद्ध करून त्यांच्याखाली त्यांचे वर्णनही लिहिले आहे. गरिबी हटविण्यात मोदी सरकारला आलेले अपयश सिद्ध करण्यासाठी ही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत, असा दावा काँग्रेसच्यावतीने केला गेला होता.
तथापि, ही छायाचित्रे भारतातील नसून बांगलादेशमधील आहेत, असे या छायाचित्रांचा मागोवा घेतल्यानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रसार माध्यम विभागाची नाचक्की झाली असून आता त्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सततच्या पराभवामुळे काँगेसला नैराश्याने ग्रासले असल्याची टीका यावर भाजपने केली आहे.
छायाचित्रात एक गरीब अल्पवयीन मुलगा वीटभट्टीमध्ये कष्टाचे काम करताना दिसत आहे. म्घेदी सरकारच्या संवेदनशीलतेमुळे भारतातील गरीब मुलांना अशी कष्टाची कामे अन्न मिळविण्यासाठी करावी लागतात, अशा अर्थाच्या फोटोओळी या छायाचित्राखाली असल्याचे दिसते. तथापि, काही वृत्तसंस्थांनी या छायाचित्रांचे परीक्षण केले असता ती भारतातील नसल्याचे आढळून आले.
या छायाचित्रांचा मागोवा घेतल्यानंतर ती मूळची बांगलादेशातील असल्याचे स्पष्ट झाले. बांगलादेशातील साधारणत: सात वर्षांपूर्वी एका मोहिमेंतर्गत तेथील एका संस्थेने घेतली होती. या छायाचित्रांचा उपयोग मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी काँग्रेसकडून केला जात आहे. सततच्या निवडणुकीतील अपयशामुळे काँग्रेस नेतृत्वाला नैराश्याने घेरले असून त्यामुळे अशी विकृत कृती हा पक्ष करीत असल्याचा आरोप भाजपच्या प्रवक्त्यांनी केला आहे.









