निपाणी पोलिसांचे कोल्हापुरात स्टिंग ऑपरेशन : खासगी आराम बसच्या चालक-क्लिनरला अटक : 9 जणांविरूद्ध एफआयआर

प्रतिनिधी /बेळगाव/निपाणी
आरटीपीसीआर करून घेण्याच्या सरकारी आदेशाचा गैरफायदा घेत बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट तयार करून प्रवाशांना कर्नाटकात आणणाऱया कोल्हापूर येथील एका रॅकेटचा निपाणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कोरोना महामारी, ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करताना आरटीपीसीआर तपासणी अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. या परिस्थितीचा फायदा घेत प्रवाशांकडून दामदुप्पट पैसे उकळल्याचे प्रकारही निपाणी पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशन वजा कारवाईत उघडकीस आले आहेत. या प्रकरणी 9 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी शुक्रवारी यासंबंधी माहिती दिली आहे. सरकारी आदेशाचे उल्लंघन करीत प्रवाशांना कर्नाटकात आणताना त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात पैसे उकळण्यात येत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे निपाणी पोलिसांनी स्वतः कोल्हापूरवरुन प्रवास करीत हा प्रकार उघडकीस आणला आहे. पोलिसांनी एक प्रकारे स्टिंग ऑपरेशनच केले आहे.
सुरेश शिवाप्पा माडहळ्ळी (मूळचा रा. विद्यानगर, हुबळी, सध्या रा. होसकट्टे, जि. धारवाड), सतीश पांडुरंग शिंदे (रा. वाई, जि. सातारा), जगदीश दोड्डपरसप्प (रा. पिळ्ळेनरदहळ्ळी, चित्रदुर्ग) या तिघा जणांना अटक करण्यात आली असून हे तिघे आनंद ट्रव्हल्सचे चालक व क्लिनर आहेत. या प्रकरणी निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात भा.दं.वि. 269, 270, 271, 420 सह कलम 34 व कर्नाटक आपत्ती निवारण कायदा 2020 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी स्वतः खासगी आरामबसमधून प्रवास करून आरटीपीसीआर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कोगनोळी टोल नाक्मयावरील तपासणी चुकविण्यासाठी खासगी आरामबस चालक काहीवेळा मार्ग बदलून कर्नाटकात प्रवेश करतात, तर आणखी काहीवेळा बनावट आरटीपीसीआर तपासणी अहवाल तयार करून कर्नाटकात प्रवेश करतात.
या टोळीकडून कर्नाटक सरकार आणि प्रवाशांचीही फसवणूक होत असल्या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी पोलीस मैदानात उतरले होते.
स्वतः मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी आपल्या 10-12 पोलीस कर्मचाऱयांना घेऊन कोल्हापूर गाठले. कोल्हापुरात खासगी ट्रव्हल्स कंपन्यांना गाठून या ट्रव्हल्स माफीया कसा चालतो याविषयी जणू पोलिसांनी स्टिंग ऑपरेशनच केले आहे.
स्वतः खासगी आरामबसमधून प्रवास करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक कशी केली जाते? याचा अनुभव पोलिसांनी घेतला आहे. जर एखाद्या प्रवाशाने आरटीपीसीआर अहवाल नाही, असे सांगितले की ट्रव्हल्स कंपनीचे कर्मचारी लगेच पैसे घेऊन त्याला अहवाल तयार करून देतात. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून हुबळीला जाण्यासाठी एका प्रवाशाकडून 1500 रुपये तिकीट दर आकारला जातो. ही तर सरळसरळ प्रवाशांची लूट आहे.
कोल्हापूर येथील शेफाली ट्रव्हल्सचे व्यवस्थापक, शेफाली ट्रव्हल्सचा एजंट अब्रार, अन्सार, आनंद ट्रव्हल्सचा चालक सुरेश माडहळ्ळी, आनंद ट्रव्हल्सचा आणखी एक चालक सतीश शिंदे, क्लिनर जगदीश दोड्डबसाप्पा, आनंद ट्रव्हल्सचा मॅनेजर, सहारा ट्रव्हल्सचा मॅनेजर व एजंट अहम्मद अशा एकूण 9 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले असून कोविड-19 मार्गसूचींचे उल्लंघन करण्याबरोबरच प्रवाशांना बनावट आरटीपीसीआर अहवाल तयार करून दिल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
आठवडय़ाभरात चार एफआयआर

निपाणी पोलिसांनी गेल्या आठवडय़ाभरात खासगी आराम बस चालविणाऱया ट्रव्हल्सविरुद्ध चार एफआयआर दाखल केले आहेत. यासंबंधी चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलीगार यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी पोलिसांनी स्वतः आरामबसमधून प्रवास करून बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट तयार करणाऱया रॅकेटचा पर्दाफाश केल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱयांसाठी आरटीपीसीआर अहवाल सक्तीचा केला आहे. या सरकारी आदेशाचा गैरफायदा घेत काही ट्रव्हल्स कंपन्या प्रवाशांची लूट करीत होते. हे थांबविण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.









