बिहारच्या एका रेशनकार्डवर 68 लोकांची नावे
एकाच कुटुंबात हिंदू आणि मुस्लीम धर्मीय
कुठल्या रेशनकार्डमध्ये कुटुंबातील 60 हून अधिक सदस्यांची नावे एकत्रित नोंद असल्याचे कधी ऐकिवात आले आहे का? एवढेच नाही तर हे सदस्य दोन विविध धर्मांशी संबंधित असल्याचे कधी वाचले आहे का? हे वाचताना अजब वाटत असले तरीही बिहारच्या वैशालीमध्ये असाच चकित करणारा प्रकार समोर आला आहे.
येथील एका रेशनकार्डमध्ये 68 लोकांची नावे नोंद आहेत. यातही सर्वात चकित करणारी बाब म्हणजे या रेशनकार्डवर हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समुदायांची नावे सामील आहेत. या खुलाशानंतर वरिष्ठ अधिकारीही अवाप् झाले, त्यांनी त्वरित याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
गरीब कुटुंबांना धान्य देण्यासाठी सरकारकडून ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना चालविली जात आहे. वैशालीत या योजनेत फसवणुकीचे अनोखे प्रकरण समोर आल्यावर प्रशासन सक्रीय झाले आहे. फसवणुकीसाठी वितरकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचा आदेश देण्यात आला आहे.
एकाच कुटुंबाला 38 क्विंटलहून अधिक धान्य देण्यात आल्याचे समजल्यावर अधिकाऱयांना धक्काच बसला होता. या कथित कुटुंबाची प्रमुख जुबैदा खातून असून याच्या सदस्यांमध्ये नवीन कुमार समवेत अन्य अनेक नावे सामील आहेत.
रेशनकार्डवर प्रत्येक कुटुंबातील सदस्य दर महिन्याला 5 किलो गहू किंवा तांदूळ प्राप्त करू शकतो. पण कोरोना संकट वाढल्याने सुमारे 6 महिन्यांसाठी रेशनकार्डधारकांना मोफत धान्य देण्यात आले होते. तसेच एक किलो चणाडाळही मोफत देण्यात आली होती.









