आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. एका स्त्रीच्या अस्तित्वाला साजरा करणारा हा दिवस. आजच्या दिवशी स्त्री-पुरुष समानता, वर्षानुवर्षे तिच्यावर झालेला अन्याय, या सर्व गोष्टी बाजूला ठेवून, ‘स्त्री’ काय आहे याबद्दल बोलूया. जगात प्रचंड गप्पा मारण्यासाठी, भावुक झाल्यावर रडून व्यक्त करणारी, शक्तीने इतर जातींपेक्षा जरी श्रे÷ नसली, तरी तिचा परिवाराच्या जेवणापासून ते सुखदुःखाचे सगळे ओझे स्वतःच्या खांद्यावर उचलण्यासाठी जाणली जाणारी ती स्त्री!
शाळेत असताना शिक्षक एक लेख लिहायला सांगायचे, आणि तो लेख लिहिताना मी नेहमी गोंधळून जायचे. ‘जर आई एक दिवसासाठी गायब झाली तर?’ मी आजही हा विचार मनात आला की गोंधळून जाते, कारण ‘आई’ सारख्या एवढा चैतन्य असलेल्या स्त्रीशिवाय आयुष्य शक्मय तरी आहे का? तसेच, ‘जर जगात स्त्री नसती तर?’ स्त्रीविना जगाची कल्पना करणेसुद्धा एक अपराध असल्यासारखे वाटते. स्त्री कित्येक वर्षे या पुरुषवादी जगात तिचे अस्तित्व जपून ठेवायला लढत आहे. तसेच, काही पुरुष स्वतःच्या गर्वाच्या आहारी जाऊन, स्त्री काय आहे हे विसरून तिच्यावर वर्चस्व गाजवत आले आहेत. पण स्त्रीवर वर्चस्व गाजवायची गरज नाही. कारण ती अद्वितीय आहे आणि तिला तसेच स्वीकारले पाहिजे.
नैसर्गिकरीत्याच स्त्री आणि पुरुषाची नुसती शारीरिकच नाही, तर मानसिक ठेवणसुद्धा निराळी आहे आणि म्हणूनच स्त्री अधिकच विशेष आहे. एका स्त्रीची चेतना इतकी सर्वव्यापी आहे की तिची बरोबरी करणे शक्मय नाही. आत्तापर्यंत तंत्रज्ञानात, गणितात, विज्ञानात किंवा भूगोलात नवीन उपक्रम घडवणाऱया स्त्रियांची संख्या जरी कमी असली, तरी ती या जगात त्याहूनही श्रे÷ जबाबदारी निभावत आली आहे. तंत्रज्ञान, गणित या सर्व गोष्टी जगाच्या उद्धारासाठी गरजेच्या आहेतच. पण या जगाचा उद्धार करणाऱया प्रत्येक माणसाला जोडून ठेवण्याचा आणि त्याचे मन स्थिर ठेवण्याची जबाबदारी जगातील सर्व स्त्रियांनी पत्करली आहे आणि मनाची स्थिरताही घरातील सकारात्मक वातावरणामुळेच येते.
माणसाचे घर हे जणू त्याचे मंदिर असते. दिवसभर थकून, निरनिराळे तणावपूर्ण काम करून जेव्हा कोणीही घरी येतात तेव्हा त्यांच्या पोटा-पाण्याची आणि मनाची काळजी करायला स्त्री सज्ज असते. जितक्मया भूमिका एक स्त्री तिच्या अख्ख्या आयुष्यात पुरेपूरपणे निभावते तितक्मया जबाबदाऱयांचे ओझे सांभाळण्याची क्षमता खूप कमी लोकांमध्ये असते आणि हे सर्व ती समाजाच्या अन्यायकारक वागणुकीशी झुंज देत असताना नकळत निभावत असते. पूर्वी एका घरात मुलगी जन्माला आली की सर्वांचे दुःखी चेहरे पहायला मिळायचे. स्त्रीचा एका घरात जन्म हा एक अद्भुत वरदान नसून शाप समजला जायचा. किती दुर्दैव आहे त्या माणसांचे जे स्त्रीसारख्या ईश्वराच्या कृपाप्रसादाला एक शाप समजत होते. तिला जन्माला येऊन स्वतःचे सामर्थ्य सिद्ध करू द्यायच्या आधीच गर्भाशयातच तिचे अस्तित्व संपवायचे. कोणी हा विचार केला का, की कदाचित समस्या ही स्त्रीमध्ये नाही, तर वर्षानुवर्षे तोच नीच, एकतर्फी विचार घेऊन जगणाऱया माणसांची आहे. समाजाने एका स्त्रीची भूमिका, तिच्या संमतीशिवाय, तिला न समजून घेता ठरवली आहे. यात तिची चूक नसूनसुद्धा ती सर्व अन्याय मागे टाकून पुरेपूर आयुष्य जगायचा प्रयत्न करत असते. यशाची तुलना ही माणसाच्या भौतिकवादी कृत्याने केली जात आहे, आणि ते का चुकीचे आहे ते मी तुम्हाला सांगते. माणसाचा जन्म का झाला, त्याच्या अस्तित्वाचा हेतू काय या प्रश्नांची उत्तरे शोधूनसुद्धा सापडणार नाहीत. पण एक गोष्ट आहे जी सर्वांमध्ये सामान्य आहे, आणि ती म्हणजे ‘भावना’. माणसाच्या मनःस्थितीवर त्याचे आयुष्य ठरते. प्रसन्न मन, प्रसन्न भावना या माणसाला क्रांती घडवायला प्रवृत्त करतात. आणि घराची शांतता, प्रसन्नता, आणि एकता जपून ठेवणे, त्याचे रक्षण करणे आणि त्यावर काही संकट वगैरे आले की खंबीर बनून ती प्रसन्नता पुन्हा निर्माण करायचे कामही स्त्रीच करते. अशा या महासत्तेला या जगात मुक्त भरारी घेण्याच्या संधी आपण जाणीवपूर्वक निर्माण केल्या पाहिजेत. ती असेल जरा भावुक, पण ही तिची दुर्बलता नसून, तिची महाशक्ती आहे. कारण या अन्यायकारक राक्षसी जगात ती तिच्या या भावुक मनाने दिलासा प्रदान करत असते. भारतीय कुटुंब प्रणालीप्रमाणे जरी पुरुष हा मुख्य असला तरी कोणत्याही अडचणीत पहिल्यांदा ओठावर आधी ‘आई गं!’ हेच शब्द येतात. कारण पुरुष हा घरातला कर्ता असला तरी स्त्री म्हणजे एक मऊ गोधडी आहे, जी वादळात सुरक्षित असल्याची जाणीव करून देते.
तिची ही अद्भुत, बहुआयामी क्षमता, मानवजातीसाठी धोका नसून, एक नाविन्याची, प्रेमाने आणि आपुलकीने भरलेले मोकळे आकाश आहे. आजच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनी, त्या सर्व अन्यायाला, त्रासाला आणि अत्याचाराला खोडून काढायचा निश्चय करूया. स्त्रीला मनुष्य म्हणून पाहूया आणि स्त्री म्हणून स्वीकार करूया. हे सर्व बदल एका दिवसात नाही होणार आणि अख्ख्या जगाला उपदेश देऊनही नाही होणार. हा बदल प्रत्येकाने आपल्या घरात सुरू केला पाहिजे. सर्वानीच, पुरुष असो किंवा स्त्री, घरातील स्त्रियांना मान द्यायला पाहिजे, त्यांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत. स्त्री स्वयंभू असली तरी तिला तो दिलासा देणे गरजेचे आहे की ती एकटी नाही. तिच्या या समाज आणि संसाराच्या लढाईत, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तिला तिचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. तिचे कष्ट तिच्यासमोर मान्य केले पाहिजेत आणि त्यात हातभारही लावला पाहिजे. आजच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनी ही छोटी छोटी पावले उचलुया आणि स्त्रीला तिच्या हक्काचे स्थान प्राप्त करून देऊया.
श्राव्या माधव कुलकर्णी








