ऑनलाईन टीम / ठाणे :
बदलापूर एमआयडीसीतील जे. के. रेमेडीज कंपनीत आज सकाळी झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विष्णु धडाम (वय 60) असे स्फोटात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. विजयपथ पिंगवा (20), झागरा मोहतो (वय 56) आणि विनायक जाधव (56) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी बदलापूर एमआयडीसीतील जे. के. रेमेडीज कंपनीत अचानक स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता परिसराच्या तीन किलोमीटर परिसरात जाणवली. घटनेची माहिती मिळताच कुळगाव-बदलापूर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत साठ वर्षीय ज्येष्ठ कामगाराचा मृत्यू झाला असून, तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.









