ऑनलाईन टीम / बदलापूर :
बदलापूरच्या एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत गुरुवारी रात्री उशिराने रासायनिक गॅसगळती झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास अडचणींचा सामना करावा लागला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच अग्निशमन दलाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या एमआयडीसीत काल (4 जून) रात्री जवळपास 10.22 मिनिटांनी नोबेल इंटरमिडीएट्स या रासायनिक कंपनीत गॅस गळती झाल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे शिरगाव, आपटेवाडी भागात अनेक लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. जवळपास दोन तासांनी म्हणजे रात्री 11.24 मिनिटांनी अग्निशमन दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सध्या ही परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे ठाणे महानगरपालिकेने सांगितले आहे.
रिऍक्टरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड जास्त पडल्याने ही गॅसगळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या रिऍक्टरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड आणि मिथाईल बेंझाईन एकत्र केले जात होते. मात्र त्यावेळी यात सल्फ्युरिक ॲसिड जास्त पडल्याने अचानक रिऍक्टरमधून गॅस लीक झाला. त्यानंतर काही क्षणातच हा गॅस आजूबाजूच्या परिसरात पसरला.
मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ही गळती रोखण्यात आली. दरम्यान, हा गॅस ज्वलनशील नसला, तरी त्यामुळे परिसरातल्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होणे, डोळे जळजळणे असे त्रास नागरिकांना जाणवू लागले होते. या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. तसेच सध्या ही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.