वृत्तसंस्था/ बडोदा
सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत रविवारी यजमान बडोदा संघाने विजयी सलामी देताना उत्तराखंड संघाचा 5 धावांनी पराभव केला. या सामन्यात बडोदा संघातील अष्टपैलू कृणाल पंडय़ाची कामगिरी शानदार झाली. या स्पर्धेतील अन्य सामन्यात गुजराथने महाराष्ट्राचा तर हिमाचलप्रदेशने छतीसगडचा पराभव करत विजयी सलामी दिली.
रविवारी देशातील 2021 च्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला सय्यद मुश्ताक अली चषक टी-20 लीग स्पर्धेने पाच विविध शहरामध्ये प्रारंभ झाला. क गटातील सामन्यात यजमान बडोदा संघाने विजयी सलामी देताना उत्तराखंडवर मात केली. या सामन्यात कृणाल पांडेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बडोदा संघाने हा विजय संपादन केला. येथील रिलायन्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बडोदा संघाने 20 षटकांत 7 बाद 168 धावा जमविल्या. त्यानंतर उत्तराखंड संघाने 20 षटकांत 6 बाद 163 धावापर्यंत मजल मारली. बडोदा संघाचे नेतृत्व करताना कृणाल पंडय़ाने पाच षटकार आणि पाच चौकारांसह 76 धावा झळकविल्या. संजय पटेलने 41 धावा केल्या. पटेल आणि पंडय़ा यांनी चौथ्या गडय़ासाठी 89 धावांची भागिदारी केली. उत्तराखंडतर्फे मधवालने 16 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर प्रत्त्युत्तरादाखल खेळताना उत्तराखंड संघातर्फे नेगीने 57 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 77 तर चंडेलाने 48 धावा जमविल्या. बडोदा संघातर्फे कृणाल पंडय़ाने 33 धावांत 2 गडी बाद केले.
या स्पर्धेतील येथील मोतीबाग मैदानावर झालेल्या सामन्यात गुजरातने महाराष्ट्राचा 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 8 बाद 157 धावा जमविल्या. अक्षर पटेलने 30, रिपाल पटेलने 29 धावा केल्या. महाराष्ट्रातर्फे चौधरीने 33 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर महाराष्ट्राचा डाव 128 धावात आटोपला. नौशाद शेखने 31 तर ऋतुराज गायकवाडने 26 धावा केल्या. गुजरात संघातील नागवासलाने 19 धावांत 6 गडी बाद केले.
या स्पर्धेतील येथील एफ बी. कॉलनी मैदानावर झालेल्या सामन्यात हिमाचलप्रदेशने छतीसगडचा 32 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हिमाचलप्रदेशने 5 बाद 173 धावा जमविल्या. आर. ठाकुरने 53 तर सेनने नाबाद 38 धावा जमविल्या. छतीसगडतर्फे विशाल सिंगने 18 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर छतीसगडने 8 बाद 141 धावा जमविल्या. अमनदीप खरेने एकाकी लढत देत नाबाद 87 धावा झळकविल्या. हिमाचलप्रदेशतर्फे वैभव अरोराने 2 तर ऋषी धवनने 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
बडोदा 20 षटकांत 7 बाद 168, उत्तराखंड- 20 षटकांत 6 बाद 163
गुजराथ 20 षटकांत 8 बाद 157, महाराष्ट्र – सर्वबाद 128
हिमाचलप्रदेश 20 षटकांत 5 बाद 173, छतीसगड 20 षटकांत 8 बाद 141.









