वार्ताहर/ हालगा
संततधार पावसामुळे बटाटे काढणी खोळंबली होती. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे बटाटा पिकाचे कुजून नुकसान झाले. महत्त्वाचे म्हणजे बटाटा बियाणे खराब निघाल्यामुळे बहुसंख्य शेतकऱयांना त्याचा मोठा फटका बसला. काही प्रमाणात आलेले बटाटा पीक काढतेवेळीच पाऊस सुरू झाल्याने हातातोंडाला आलेल्या बटाटा पिकाचे नुकसान झाले. एकूणच यावर्षी बटाटा उत्पादक शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तेव्हा सरकारने बटाटा उत्पादक शेतकऱयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.
शहराच्या पूर्व व दक्षिण भागामध्ये असलेल्या हालगा, बस्तवाड, मास्तमर्डी, शरणमट्टी, तारिहाळ, कोंडसकोप्प, खामकारहट्टी, कोळीकोप्प, नंदिहळ्ळी, होनगा, बंबरगा, कट्टणभावी, मण्णीकेरी, केदनूर, कडोली, हंदिगनूर, बेकिनकेरे, उचगाव, बेळगुंदी, मण्णूर, आंबेवाडी, कुद्रेमनी, किणये आदी भागांत शेतकरी बटाटा उत्पादन घेतात.
बटाटा बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱयांना मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागली. बटाटा पीक हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून असते. त्यामुळे अनेकवेळा फटका बसत आहे. यावर्षी तर बटाटा बियाणेच खराब निघाली. त्यामुळे सुरुवातीलाच शेतकऱयांना फटका बसला होता. त्यानंतरच शेतकऱयांनी पुन्हा बटाटे खरेदी करून लागवड केली. त्यानंतर पावसाच्या लहरीपणाचा फटका या पिकाला बसला. त्यामुळे बटाटा उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. या उत्पादनातून बियाणे खरेदी केलेली रक्कम देखील निघणे अवघड झाले आहे. बटाटा उत्पादक शेतकऱयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये बटाटा उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. कारण उत्पादनाचा व खर्चाचा ताळमेळ मिळणे अवघड झाले आहे. बटाटा लागवड करणारे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले. काही शेतकऱयांनी तर या कर्जबाजारीपणामुळे आपले जीवन संपविले आहे. आज बाजारपेठेत बटाटा मागणी वाढली. याचबरोबर दरही वाढला. मात्र, उत्पादन कमी झाले त्यामुळे दर वाढला तरी शेतकऱयांना त्याचा काहीच फायदा झाला नाही.
शेतकरी हा मुळातच कर्ज काढून बटाटा लागवडीचा जुगार खेळत आला आहे. बियाणांपासून खतापर्यंत खरेदी करण्यासाठी एक तर कर्ज घ्यावे लागते. अन्यथा अडत व्यापाऱयाकडून बी-बियाणे खरेदी करावी लागतात. त्यामुळे शेतकऱयाला नफा मिळणे कठीण आहे.
दरवर्षीच लहरी पावसाचा फटका
मुळात बटाटा पीक हे पाऊस आणि हवामानावरच अवलंबून असते. काही वेळा दमदार पाऊस कोसळतो. त्यामुळे बटाटा पिकामध्ये पाणी साचून बटाटा पीक खराब होते. तर काही वेळा बटाटा पिकाला आवश्यक असलेल्या वेळीच पाऊस दडी मारतो. त्यामुळे दरवर्षीच या लहरी पावसाचा फटका या पिकाला बसत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वात जास्त उत्पादन येणाऱया गावातील शेतकऱयांनी बटाटा लागवडीकडे पाठ फिरविली आहे. जर भविष्यात बटाटा पिकाचे उत्पादन घ्यायचे असेल तर कृषी विभागाने त्यासाठी शेतकऱयांना मार्गदर्शन आणि आर्थिक मदत करणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा एक दिवस सर्वच शेतकरी बटाटा पीक उत्पादनापासून दूर जातील. तेव्हा याचा कृषी विभागाने गांभीर्याने विचार करून नुकसानग्रस्त शेतकऱयांना योग्य ती नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे.









