कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लंडनमधील रॉयल ब्रॅम्टन चॅरिटेबल ट्रस्टला करणार मदत
वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने गत वर्षी झालेल्या 2019 वर्ल्ड कप फायनलमधील जर्सीच्या लिलावापासून कोरोना व्हायरसविरूद्ध लढाईत मदत करण्यासाठी 65,000 पौंड (60 लाख रुपये) जमा केले आहेत. गेल्या वर्षी लॉर्ड्स येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात बटलरने ही जर्सी घातली होती. लंडनमधील रॉयल ब्रॅम्प्टन आणि हर्टफिल्ड हॉस्पिटलसाठी त्यांने हा निधी जमा केला आहे.
जोस बटलरने मागील आठवडय़ात जर्सीला ईबे या ऑनलाईन वेबसाईटवर लिलावासाठी ठेवले होते. मंगळवारी जेव्हा त्याचा लिलाव बंद झाला तेव्हा त्याकरिता 82 लोकांनी बोली लावल्या होत्या. यावेळी लंडनमधील एका उद्योगपतीने 65,100 पौंडच्या किंमतीत ही जर्सी खरेदी केली आहे. लिलावात मिळालेली रक्कम रूग्णालयांत आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी केली जाईल. विशेष म्हणजे, इंग्लंडमध्ये कोरोना महामारीने कहर केला असून देशाचे पंतप्रधान कोरोनामुळे आयसीयूमध्ये दाखल झाले आहेत. अनेक लोकांचे बळी गेले असून उपचारासाठी निधी देखील कमी पडत आहेत. अशा वेळी जोस बटलरने आपल्या जर्सीचा लिलाव करत मोलाचे योगदान दिले आहे.
जगातील अन्य खेळाडूंचेही मोलाचे योगदान
दरम्यान, बटलरनंतर तत्कालीन दिग्गज खेळाडू जॅक निकल्सन आणि मायकेल फेल्प्स यांनी कोविड-19 विरूद्ध लढाईत मदत करण्यासाठी त्यांच्या संस्मरणीय गोष्टींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. भारतात, क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी या व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी आपल्या परीने मदत जाहीर केली आहे. अनेक खेळाडू पैशांच्या मदतीशिवाय वैयक्तिक मदत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. यात गौतम गंभीर, हरभजन सिंहसह अन्य प्रसिद्ध खेळाडूंचा समावेश आहे.









