किरीट सोमय्या यांचा आरोप : देशमुख जेलमध्ये जातील ; परब जेलच्या वाटेवर ः आता नंबर आव्हाड यांचा
प्रतिनिधी/सांगली
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लूकआऊटची नोटीस बजाविण्यात आली आहे. लवकरच ते जेलमध्ये असतील. तर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या जेलमध्ये जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पुढील आठवडÎात यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचीही भर पडेल. त्यांनीही बॅग भरुन तयार रहावे, असा सूचक इशारा भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केले. त्याचबरोबर आरटेओ अधिकारी बजरंग खरमाटे हे मंत्री अनिल परब यांचे सचिन वाझे आहेत, असा आरोपही सोमय्या यांनी केला.
मंत्री अनिल परब यांचे स्वीय सहायक आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याकडे 750 कोटींची मालमत्ता आहे. 60 ते 70 हजार रुपये पगार असलेल्या अधिकाऱयांकडे एवढी संपत्ती आली कशी? असा सवाल उपस्थित करत सोमय्या म्हणाले, परब यांच्या सहायकाकडे एवढी संपत्ती असेल तर अनिल परब यांच्याकडे किती असेल? मी पुराव्याशिवाय बोलत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी माझ्या आरोपांबाबत उत्तर द्यायचे असेल तर हे घोटाळे आम्ही केले नाहीत, असे म्हणून दाखवावे, असे खुले आव्हान त्यांनी दिले.
आता पुढचा नंबर खासदार भावना गवळी आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा असेल. आव्हाड बॅग भरू तयार रहावे, असे सांगून ते म्हणाले, रश्मी ठाकरे यांच्या नावे तर 19 बंगले आहेत. ते अन्वय नाईककडून यांच्याकडून खरेदी केले होते. सहा वर्षे त्याचा कर ठाकरे यांनी नाईकच्या नावे भरला आणि गेल्यावर्षी त्या मालमत्ता ठाकरे यांनी नावावर करुन घेतल्या आहेत. हे सरकार अकरा खेळाडू आणि बारावा राखीव खेळाडू घेऊन फक्त घोटाळे करत असल्याचा आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
सोमय्या म्हणाले, कोरोना काळात ठाकरे सरकारने अनेक घोटाळे केले आहेत. केवळ पैशांचा विचार करणारे हे सरकार आहे. आपण जे आरोप केले आहेत, ते पुराव्यानिशी आहेत. खोटे असतील तर ठाकरे, देशमुख, परब यांनी तसा खुलासा करावा. मात्र त्यांच्याकडून काहीही बोलले जात नाही. यामुळेच यामध्ये पाणी मुरतंय हे निश्चित आहे. मी शिवसेनेला घाबरत नाही. माझ्यावर दोनदा प्राणघातक हल्ला झाला. ठाकरे सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी माझीही चौकशी करावी. खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, प्रदेशचे मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.
खरमाटेंच्या फार्म हाऊसची पाहणी
सोमय्या यांनी वंजारवाडी (ता. तासगाव) येथे खरमाटे यांच्या फार्महाऊससोबत सेल्फी काढला. विटा रोडवरील प्रथमेश पाईप फॅक्टरीची पाहणी केली. काही जमिनी पाहिल्या. कुपवाडमध्ये मालमत्तेची पाहणी केली. दरम्यान खरमाटे हे परबांचे सचिन वाझे आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला. परबाचे रिसॉर्ट, नार्वेकर यांचा बंगला अनधिकृत आहे, असेही त्यांनी सांगितले.








