अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या अन् आराध्याला बाधा : जया बच्चन यांचा अहवाल निगेटिव्ह
: तब्बल 54 जणांच्या संपर्कात : 28 जणांची झाली चाचणी
प्रतिनिधी/ मुंबई
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा पुत्र अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी रात्री समोर आले होते. तर रविवारी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि मुलगी आराध्यालाही कोरोना महामारीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अमिताभ यांच्यावर सध्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून अमिताभ यांच्या चारही बंगल्यांना सील ठोकले आहे.
अमिताभ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांचीही चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये अभिषेकचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर जया बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचा अहवाल प्रारंभी निगेटिव्ह असल्याचे बोलले जात होते. पण रविवारी दुपारी ऐश्वर्या आणि आराध्या यांच्या दुसऱया चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अमिताभ यांच्या जनक, प्रतीक्षा, वत्सा आणि जलसा या चारही बंगल्यांचं महापालिकेच्या अधिकाऱयांनी सॅनिटायजेशन केले आहे. बच्चन कुटुंबातील अमिताभ यांची कन्या श्वेता नंदा, अगस्त्या नंदा आणि नव्या नवेली तसेच जया बच्चन यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
संपर्कातील लोकांची यादी
बच्चन कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी महापालिकेने तयार केली आहे. यादीत 58 जणांची नावे असून यातील 28 जणांची चाचणी करण्यात आली आहे. उर्वरित लोकांची चाचणी लवकरात लवकर केली जाणार आहे. 28 जणांच्या चाचणीचा अहवाल सोमवारी प्राप्त होणार आहे.
रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी
महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांना कोरोनाची लागण झाल्याने नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अमिताभ यांच्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जुहू येथील अमिताभ यांच्या दोन्ही बंगल्याबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बिग बी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळल्यावर अनेक चाहते रुग्णालयाबाहेर जमू लागले आहेत. मात्र पोलिसांकडून या चाहत्यांना हटविण्यात येत आहे.
देशभरात पूजा अन् यज्ञ
अमिताभ यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी याकरता देशातील अनेक भागांमध्ये पूजा तसेच यज्ञ केला जात आहे. कोलकाता येथील लोकांनी अमिताभ यांच्यासाठी शिव मंदिरात यज्ञ केला आहे. याचबरोबर ऑल सेलिब्रिटी प्रेंडस क्लबच्या सदस्यांनी पूजेचे आयोजन केले आहे.
अनुपम खेर यांच्या मातोश्रींना लागण
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या मातोश्री दुलारी, भाऊ राजू आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली आहे. अनुपम खेर क्वारंटाईन झाले आहेत. ट्विटरवरून व्हिडिओ शेअर करत अनुपम खेर यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून माझी आई काहीच खात नव्हती. आम्ही रक्तचाचणीही केली. पण त्यातही काही आढळून आले नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिला कोकिलाबेन रूग्णालयात दाखल केले आहे. तर माझा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलगी यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांचीही लक्षणे सौम्य आहेत. मीसुद्धा स्वत:ची कोरोना चाचणी केली. पण माझा अहवाल निगेटिव्ह आला आहे, असे त्यांनी म्हटले.
टीव्ही अभिनेता पार्थ समथानला कोरोनाची लागण
‘कसोटी जिंदगी के’ या मालिकेत अनुराग बासू ही प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता पार्थ समथानला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या मालिकेचे चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. पार्थच्या संपर्कात आलेल्या कलाकार आणि तंत्रज्ञांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पार्थने ट्विटरवरून याची माहिती दिली.
माझी प्रकृती ठणठणीत : राज्यपाल
माझ्या प्रकृतीसंदर्भात प्रसारमाध्यमांत काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वफत्त हे निराधार असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे. माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. मात्र, इतरत्र असलेली परिस्थिती पाहून आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत. यासंदर्भात आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वफत्त निराधार आहे. माझी तब्येत चांगली आहे, असे राज्यपालांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.
मला काहीही झालेले नाही: हेमामालिनी
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अभिनेत्री हेमामालिनी यांचीही प्रकृती बिघडल्याचे बोलले जात होते. पण माझी प्रकृती अगदी ठणठणीत असल्याचे हेमामालिनी यांनी स्पष्ट केले. मला काहीही झालेले नाही. भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने मी ठणठणीत आहे. माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल आभारी आहे. तुम्हीही घरीच राहा आणि सुरक्षित राहा, असे हेमामालिनी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. ईशा देओलनेही हेमामालिनी यांना रूग्णालयात दाखल केल्याच्या वृत्तास नकार दिला.









