प्रतिनिधी/ रत्नागिरी
महिलां बचत गटांनी उत्पादित केलेल्या पदार्थांना बाजारपेठ मिळावी यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी दिवाळी काळात मंत्रालय मुंबईत किमान 3 दिवस विक्री केंद्र उभे करण्यात येणार असल्याचे या महामंडळाच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांनी सांगितले. बचत गटातील इच्छित महिलांनी आपली नावे 3 दिवसांमध्ये जिल्हा कार्यलयात नोंदवावीत, असे आवाहन त्यांनी केले.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत समुद्री शैवाल संवर्धन प्रकल्पाचे निधी वितरण रत्नागिरीत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांच्याहस्ते पार पडले. तसेच दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान रत्नागिरी आणि महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय रत्नगिरीअंतर्गत शहर उपजीविका केंद्रा गारमेंट युनिटचेही उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महिला बचत गटांना 11 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. यावेळी महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांनी उत्पादित केलेले मास्क, पिशवी, गारमेंट उत्पादित वस्तूंची पाहणी करण्यात आली.
महिलांच्या मालाला ई बिजनेस मार्केटिंग मिळावी यासाठी ऍमेझोन आणि फ्लिप कार्ड वर सोनचीरैया या ब्रॅन्डखाली महिलांची उत्पादनांची विक्री करण्यात येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील गोळप ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमात समुद्र शैवाल प्रकल्पासाठी माविमतर्फे 25 टक्के रकमेचे वाटप करण्यात आले आहे. तसेच पर्यावरणपुरक कापडी पिशवी शिलाई कामांसाठी महिला बचत गटांना निधी वितरण आणि पावस ग्रामसंस्थेला लोकसंचित साधन केंद्रातून मंजूर झालेल्या कर्जाचे वितरण करण्यात आले.
जिह्यतील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचे स्वतंत्र ब्रॅन्ड तयार करावा. जेणे करून जिह्याची स्वतःची ओळख तयार होऊन महिलांच्या उत्पादनाची विक्री होईल. महिलांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी लवकरंच पाक कला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून त्या स्पर्धेत विशेष पदार्थ बनवून सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. महिलांना रोजगारासाठी लागणारे बँक कर्ज हे खास महिलांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रशी करार करून कमी व्याजदराने प्रति व्यक्ती 1 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याची तरतूद सध्या महामंडळमार्फत करण्यात आल्याचे यावेळी माविमतर्फे सांगण्यात आले.
कर्करोगग्रस्त महिलांना स्वतंत्र यंत्रणेमार्फत मुंबईत मोफत उपचार
महिलांना आरोग्य विम्याबद्दल जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी महिलांनी शासकीय विमा काढून आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. ज्या महिलां कर्करोगग्रस्त असतील, त्या महिलांसाठी एक स्वतंत्र यंत्रणेमार्फत मोफत उपचार मुंबईत केले जाणार असल्याचे माविमतर्फे सांगण्यात आले.









