मशिदींमध्ये 50 टक्के लोकांच्या उपस्थितीत नमाज अदा
प्रतिनिधी /बेळगाव
मुस्लीम धर्मियांचा बकरी-ईद सण बुधवारी अत्यंत साध्या पद्धतीने बेळगाव शहर व तालुक्मयात साजरा झाला. कोरोनामुळे मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदानऐवजी मशिदींमध्ये 50 टक्के लोकांच्या उपस्थितीत नमाज अदा केली. ज्या-ज्या परिसरात मशिदी आहेत त्या-त्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आले.
अनलॉक झाल्यानंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरू होत असल्याने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा उत्साह दिसून आला. यामुळे दरबार गल्ली, खडेबाजार या परिसरात कपडे, ड्रायप्रूट्स व इतर साहित्य खरेदीसाठी मागील दोन दिवसांपासून गर्दी झाली होती. बुधवारी बकरी-ईदचा मुख्य दिवस असल्याने सकाळपासूनच मुस्लीम बांधव नवे पोषाख घालून मशिदींमध्ये नमाज पठणासाठी दाखल झाले होते.
मशिदीमध्ये केवळ 50 टक्केच नागरिकांना प्रवेश
एकाचवेळी मशिदींमध्ये गर्दी होऊ नये यासाठी 50 टक्केच नागरिकांना प्रवेश दिला जात होता. सामाजिक अंतर राखून नमाज अदा करण्यात आली. सॅनिटायझर, मास्कचा वापर तसेच थर्मल स्क्रिनिंग करून प्रवेश दिला जात होता.
गरजूंना देण्यात आले दान
मशिदीमध्ये नमाजनंतर धर्मगुरुंनी उपस्थित मुस्लीम बांधवांना संदेश दिला. कोरोनाचे संकट लवकर दूर होऊन पूर्वीप्रमाणेच सर्वांचे आयुष्य सुखकर होवो, अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यानंतर गरजू व्यक्तींना दान करण्यात आले. यंदा सलग दुसऱयावषी अत्यंत साध्या पद्धतीने बकरी-ईद साजरी करण्यात आली.









