वार्ताहर /कडोली
बंबरगा येथे उभारण्यात आलेल्या नूतन मंदिरात प्रतिष्ठापित होणाऱया श्री जोतिबा मूर्तीची टाळ-मृदंग आणि ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. सोमवारी प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटन सोहळा होणार आहे.
बंबरगा येथे देवस्थान पंच कमिटी, ग्राम पंचायत, युवक मंडळे, महिला मंडळे आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री जोतिबा मंदिराची नूतन इमारत बांधण्यात आली आहे.
या मंदिराचा उद्घाटन सोहळा रविवारपासून सुरू झाला. सकाळी कडोली येथील श्री बसवाण्णा मंदिरापासून जोतिबा मूर्तीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. गुलालाची उधळण, टाळ मृदंगाचा गजर आणि ढोल-ताशांच्या गजरात निघालेली मिरवणूक कडोली-देवगिरीमार्गे बंबरगा गावात दाखल झाली. या मिरवणुकीत भजनी मंडळे आणि कळशी घेऊन सुहासिनींनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला होता.
सोमवारी श्रीक्षेत्र पंचग्राम मुक्तीमठाचे श्री श्री श्री तपोरत्न ब्रह्मर्षी शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात मंदिरात होम, वास्तूशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कळसारोहण आणि मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत बंबरगा भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम तर रात्री हभप शशिकांत गावडे यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवारी दुपारी 12 ते 4 पर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे.









